सर्वकाही देऊनही भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली - जयंत पाटील

सर्वकाही देऊनही भास्कर जाधवांनी राष्ट्रवादी सोडली - जयंत पाटील


रत्नागिरी - पक्षप्रवेशासंदर्भात महाविकास आघाडीत अलिखित करार आहे, पण दापोलीमध्ये पक्षप्रवेश कोणाचा होणार आहे, याची मला कोणतीच माहिती नव्हती; मात्र जे राष्ट्रवादीत आले त्यांचे पूर्वीच्या पक्षात स्थानिक नेतृत्त्वाशी मतभेद होते. प्रवेश केलेल्या तिघांपैकी एका व्यक्तीला पक्षातून काढून टाकले होते, तर अन्य दोघे पक्षातून बाहेर पडलेले होते, अशी सावध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत कोणतीच कुरबूर नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

रत्नागिरीत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावरून विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु एकमेकांचे कार्यकर्ते प्रवेश करून घ्यायचे नाहीत, असे आघाडी करताना ठरलेले होते. दापोलीतील कार्यक्रमावेळी गुरुवारी (ता. २८ ऑक्टोबर) प्रवेशासाठी आलेल्यांची ओळख करून देण्यात आली. ते पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन बाहेर पडलेले होते. यावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतीही कुरबूर होणार नाही, तो कालचा प्रवेश होता. आज पुन्हा प्रवेश करून घेतलेले नाहीत. तीनही पक्षांत समन्वय असून मुख्यमंत्री चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहेत.