गांधी हत्या सावरकरांमुळेच झाली – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (व्हिडिओ)

काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक अतुल लोंढे यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत सावरकरांविषयी काँग्रेसचे असलेले मत बदलणार नसल्याचे सांगितले आहे.

गांधी हत्या सावरकरांमुळेच झाली – काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे (व्हिडिओ)

मुंबई - राहुल गांधींकडून सावरकरांवर होणाऱ्या टीकेवरून शिवसेना-काँग्रेस आमनेसामने आले आहेत. सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. त्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली. गांधी हत्या सावरकरांमुळेच झाल्याचं म्हणत लोंढेंनी काँग्रेसची भूमिका कायम असल्याचं सांगितलंय.

राहुल गांधी कर्नाटकमधील एका सभेत बोलताना म्हणाले की, नीरव मोदी, ललित मोदी हे चोर आहेत. मोदी आडनावाचे सगळेच चोर असतात. अशी टीका त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली होती. त्यामुळे गुजरातमध्ये एका मोदी आडनावाच्या व्यक्तीने राहुल गांधी यांच्या विरुद्ध सुरत मध्ये खटला दाखल केला. मोदी आडनावाच्या सर्वांचीच राहुल गांधी यांच्यामुळे बदनामी झाली असे त्या दाव्यात म्हटले होते.

या खटल्याचा नुकताच निकाल लागून न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच वरील न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत देत त्यांना जामीन दिला आहे. तत्पूर्वी न्यायाधिशांनी राहुल गांधी यांना या आरोपावर खुलासा मागितला असता त्यांनी आपण या मुद्द्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने न्यायाधिशांना शिक्षा ठोठवावी लागली.

दरम्यान, राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याने नियमांचा आधार घेत लोकसभा सभापतींनी २४ तासांच्या आत राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतली. त्यामुळे देशात एकच राजकीय गदारोळ उडाला आहे. भाजप व काँग्रेस आमने सामने आले आहेत. तर राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचे सांगत मी म्हणजे सावरकर नाही माफी मागायला असे ट्विट करून या आगीत आणखी तेल ओतले.

दरम्यान, या वादात आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही उडी घेतली आहे. नाशिकच्या काल झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला सावरकर आमचे दैवत आहे. सावरकरांविषयी बोलताना काँग्रेसने तारतम्य बाळगावे असा सल्ला दिला आहे. तसेच सावरकरांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही असे सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला ठणकावले आहे.

शिवसेनेनी सावरकरांविषयी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्राचे मुख्य प्रवर्तक अतुल लोंढे यांनीही काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत सावरकरांविषयी काँग्रेसचे असलेले मत बदलणार नसल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर सावरकरांमुळेच देशात गांधींची हत्या झाली असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे व संजय राऊत काय भूमिका घेणार याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले आहे.

https://youtu.be/903_7Be_WWI