नाशिककरांची चिंता वाढली ! सापडला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 

नाशिककरांची चिंता वाढली ! सापडला ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण 
नाशिक-
नाशिकमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून कोरोना ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेच्या माली देशातील एका खासगी कंपनीमध्ये काम करणारी ही व्यक्ती आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता या रुग्णाचा अहवाल पुण्याच्या NIV लॅबकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्यात करण्यात येत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थ्यांमुळे गजबजल्या आहेत. बहुतांश विद्यार्थी मास्क घालून शाळेत येत आहेत. ज्यांनी मास्क घातला नाही, त्यांना स्वतः गुरुजी मास्क देत आहेत. मात्र, दुसरीकडे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी मास्क वापरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात कोरोनाच्या 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे प्रशासनाची तूर्तास तरी झोप उडाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 859 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत तीनशे तीस रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 28, बागलाण 8, चांदवड 5, देवळा 4, दिंडोरी 11, इगतपुरी 19, कळवण 5, मालेगाव 4, नांदगाव 5, निफाड 36, सिन्नर 22, त्र्यंबकेश्वर 3, येवला 24 अशा एकूण 172 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 141, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 6 तर जिल्ह्याबाहेरील 9 रुग्ण असून, एकूण 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 927 रुग्ण आढळून आले आहेत.