राहुल गांधींवर आणखी चार मानहानीचे खटले प्रलंबित आहेत

राहुल गांधींवर आणखी चार मानहानीचे खटले प्रलंबित आहेत

नवी दिल्ली – राहुल गांधींवर देशातील तीन राज्यांत चार खटले प्रलंबित आहेत. त्यांचा निकाल येणे बाकी आहे. महाराष्ट्रात दोन ठिकाणी एक शिवडी येथे तर दुसरा भिवंडी येथे खटला सुरू आहे. तर तिसरा खटला झारखंडची राजधानी रांची येथे तर आणखी एक खटला आसाममधील गुवाहाटी येथे सुरू आहे.

2014 मध्ये राहुल गांधींनी महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप संघावर केला होता. संघाच्या एका कार्यकर्त्याने राहुलविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्रातील भिवंडी न्यायालयात हा खटला सुरू आहे.

2016 मध्ये, कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधी यांच्याविरुद्ध गुवाहाटी, आसाम येथे मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार, राहुल गांधी म्हणाले होते की, संघाच्या सदस्यांनी मला आसाममधील 16व्या शतकातील वैष्णव मठ बारपेटा सत्रामध्ये प्रवेश दिला नाही. यामुळे संघाची प्रतिमा खराब झाली आहे. हे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे.

2018 मध्ये झारखंडची राजधानी रांचीमध्ये राहुल गांधींविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. रांचीच्या उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल यांच्यावर 20 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राहुल यांच्या विधानावर आक्षेप नोंदवण्यात आला असून त्यात त्यांनी 'मोदी चोर आहे' असे म्हटले आहे.

2018 मध्येच महाराष्ट्रात राहुल गांधींवर आणखी एक मानहानीचा खटला दाखल करण्यात आला. माझगाव येथील शिवडी न्यायालयात हा खटला सुरू आहे. आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघाच्या कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला होता. गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध भाजप आणि संघाच्या विचारसरणीशी जोडल्याचा आरोप राहुल यांच्यावर आहे.