सोलापुरात कोरोनाचे दोन्ही डोस आवश्यकच; अन्यथा रेशन, मॉलमध्ये प्रवेशबंदी

सोलापुरात कोरोनाचे दोन्ही डोस आवश्यकच; अन्यथा रेशन, मॉलमध्ये प्रवेशबंदी
सोलापूर - 
सोलापूर शहर व जिल्हयात कोरोना लसीकरण संथगतीने होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करीत लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. दरम्यान कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस नागरिकांनी घेणे आवश्यक असून दोन्ही डोस घेतले नसतील तर अशा नागरिकांचे रेशन दुकानातील धान्य बंद करण्याबरोबरच महापालिका, सेतू, मॉल व सरकारी कार्यालयात प्रवेशबंदी केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

गुरूवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात शंभरकर यांनी पोलीस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, जिल्हा पुरवठा विभाग यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकार्‍यांना कडक शब्दात सूचना दिल्या. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, महापालिका उपायुक्त धनराज पांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ बसवराज लोहार उपस्थित होते.           
कोरोना संसर्गाच्या दोन लाटानंतर आता तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. ओमीक्रॉन नावाच्या नव्या कोरोना व्हेरियंटची सध्या भीती आहे. असे असताना सोलापूरच्या ग्रामीण भागात 6 लाख तर शहरी भागातील 2 लाख नागरिकांनी अद्याप कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही. ओमीक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकार्‍यांना सूचना देताना लसीकरणाची आकडेवारी सांगून त्यांनी प्रथम नाराजी व्यक्त केली. महापालिका प्रवेशद्वार, रेशन दुकाने, सेतू कार्यालय, झोन कार्यालय, बिग बझार, डी मार्ट अशा ठिकाणी लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश द्या, पोलीस संरक्षण घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.