राहुल गांधींच्या निलंबनानंतर महाराष्ट्रातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

राहुल गांधींच्या निलंबनानंतर महाराष्ट्रातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

मुंबई - देशातील लोकशाही वाटचाल संपवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. राहुल गांधी रस्त्यावर चालत होते. त्यावेळी यांच्या छातीतील धडधड वाढू लागली होती. राहुल गांधी देशातील सर्व जातीच्या लोकांना एकत्र आणून पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहेत.राहुल गांधी यांना सत्ताधारी घाबरल्याचं प्रतीक आहे. देशातील मुख्य विरोधकाला संपवण्याचा प्रयत्न आहे. हे सत्ताधाऱ्यांना महागात पडेल, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली त्यावेळीच हेतू काय आहे हे स्पष्ट झालं होतं. सुरत कोर्टाची कागदपत्र लोकसभा सचिवालयाकडे गेली असतील. म्हणजेच हा निर्णय कुणी घेतला असेल हे माहिती आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांची देशभर लोकप्रियता वाढू लागली आहे. दुसरीकडे महागाई आणि इतर मुद्यांमुळं नरेंद्र मोदी यांची अप्रियता वाढू लागली आहे. त्यामुळं ही कारवाई सूड भावनेतून करण्यात येत आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. या देशात व्यक्तीस्वातंत्र्य आहे. नरेंद्र मोदींनी चीनमध्ये जी वक्तव्य केली होती, त्याबद्दल त्यांनी सांगावं. चार पाच वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन कटकारस्थान करुन ही कारवाई करण्यात आली आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकशाहीच्या मुळावर हे सगळे कसे येत आहेत, संस्था वेठीला कशा धरल्या जातायत हे आता दिसत आहे. अपेक्षा होतीच की हे असं काही घडणार. उद्या अपीलात जर सांगितलं की हे सदस्यत्व रद्द करणं चुकीचं होतं, तर काय करणार तुम्ही? यामुळे राहुल गांधींचं वैयक्तिक नुकसान काय होईल माहिती नाही, पण भाजपाचं नक्कीच होईल. सूरतला या खटल्याच्या सुनावणीच्या दोन दिवस आधी न्यायाधीश बदलले गेले – अरविंद सावंत

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहूल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत हुकूमशाहिच्या अंताची ही सुरुवात आहे. लढत राहू - उद्धव ठाकरे

निवडणुकीच्या सभांमध्ये केलेल्या वक्तव्याची दखल बऱ्याच दिवसानी घेऊन या प्रकारची शिक्षा कोर्टाकडून सुनावली जाते. त्यावर तत्परतेनं लोकसभा काम करते. राहुल गांधींची खासदारकी रद्द होते हे निषेधार्ह आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. बाहेरचं भांडण सभागृहात आणण्याचा हा प्रयत्न आहे – नितीन राऊत

इंदिराजींच्या बाबतीतही असंच त्या वेळचं सरकार थोडं वेगळ्या पद्धतीने वागलं,. ज्या इंदिरा गांधींना १९७७ साली आणीबाणीच्या निमित्ताने पराभूत केलं होतं, त्याच इंदिरा गांधींना १९८० साली पुन्हा सत्तेत बसवण्याचं काम लोकशाहीनं केलं. त्यामुळे आत्ताच्या घटना सामान्य माणसांना पटणाऱ्या नाहीत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदाराची खासदारकी रद्द केली गेली. वैचारिक मतभेद असू शकतात. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत कुणाची खासदारकी रद्द केल्याचं मलातरी काही आठवत नाही. हे संविधानात बसत नाही. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. पण तरी आज ज्या प्रकारचा निर्णय लोकसभेनं घेतलाय, तो आपल्या लोकशाहीला धक्का देणारा आहे – अजित पवार

हा निर्णय लोकशाहीविरोधातला आहे. गेल्या ९ वर्षांत मोदींचं सरकार आपल्या मित्रोंसाठी, ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्यासाठी किंवा अशा अनेक लोकांसाठी पाठिंबा देण्याचं काम मोदींचं सरकार करतंय. त्यांच्याविरोधात राहुल गांधी आवाज उठवत आहेत. त्यांना लोकसभेत बोलू दिलं जात नाहीये. खोटी तक्रार गुजरातमध्ये टाकून जिल्हा न्यायालयाकडून निर्णय घेऊन राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला – नाना पटोले