अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस बंदी 

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस बंदी 
रत्नागिरी - 

करोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर मंगळवारी येणारी अंगारकी ही पहिलीच अंगारकी संकष्टी आहे. त्यापार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास पुढील दोन दिवस पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. तसेच त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे. 
 
मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस भाविकांना गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जवळपास एक ते सव्वा लाख भाविक अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणपतीपुळेला येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचं जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी म्हटलं आहे. यावेळी भाविकांना करोना नियमांचं पालन करणं देखील बंधनकारक असणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी काही भरारी पथकं देखील नेमली जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे, असंही ते म्हणाले.

गणपतीपुळे येथे अंगाकरी संकष्टी निमित्त बाहेरुन देखील मोठ्या प्रमाणात व्यापारी, छोटे – मोठे स्टॉलधारक येत असतात. पण, यावेळी मात्र त्यांना मंदिर परिसरात स्टॉल लावता येणार नसून स्थानिक व्यापाऱ्यांचे दोन डोस झालेल्या असल्याल त्याला प्राधान्य दिलं जाईल, असंही बी. एन. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्याशिवाय, बाहेरुन येणाऱ्यांना प्रसादाचे स्टॉल लावण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे.