‘वायसीएम’मधील ‘एक्स रे’ची यंत्रणा कोलमडली

‘वायसीएम’मधील ‘एक्स रे’ची यंत्रणा कोलमडली

२४ तासांपासून एकाही रुग्णांचा एक्सरे नाही; गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरात करोना रुग्णांचे दर पंधरा मिनिटाला बळी जात असताना करोनाची परिस्थिती आणखीनच गंभीर बनत चालली असून कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणाऱ्या प्रशासाकीय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. वायसीएममधील रुग्णांचा एक्स रे काढणारी संपूर्ण यंत्रणाच बंद पडल्यामुळे गंभीर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. केवळ बैठकांचा ‘बाऊ’ करणारे महापालिका आयुक्त या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण हे रुग्णालय पूर्णपणे कोविड समर्पित करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये सध्या सातशेहून अधिक कोविडचे रुग्ण उपचार घेत आहेत. तर त्यापैकी निम्मे रुग्ण हे ऑक्सीजनवर आहेत. सध्या या ठिकाणी असलेल्या पाच आयसीयू आणि चार एसयूडीमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ऑक्सीजन (ओ २) तसेच आयसीयू आणि एसयूडीमधील रुग्णांच्या छातीचा दैनंदिन एक्स रे काढून पुढील उपचार पद्धतीने ठरवावी लागते. मात्र रविवारी दुपारपासून वायसीएम रुग्णालयातील संपूर्ण एक्स रे यंत्रणाच कोलमडली असून गेल्या चोवीस तासांत एकाही रुग्णाचा एक्स रे काढण्यात आलेला नाही.

महापालिकेच्या भांडार विभागाने काही महिन्यांपूर्वी ९६ लाख रुपये खर्च करून पोर्टेबल एक्स रे आणि डिजिटल एक्स रे मशीन खरेदी केली होती. त्यापैकी केवळ एकच मशीन उपयोगात आली होती. या मशीनच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्यानंतरही तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राजकीय दबावापुढे मान झुकवत या मशीन ताब्यात घेतल्या होत्या. तसेच ठेकेदाराला बिल अदा केले होते. मशीन ताब्यात घेतल्यापासून चार मशीन एक्स रे विभागात धुळ खात पडून आहेत. या मशीनसाठी लागणारी इतर साधणे खरेदी करण्यात न आल्यामुळे आजपर्यंत या मशीन वापरात आलेल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे एक्स रे डिपार्टमेंटने या मशीन वापरात आणण्यासाठी वारंवार कंम्प्यूटराईज्‌ड रेडिओग्राफी उपलब्ध करून द्यावी यासाठी मागणी केली. मात्र केवळ आपल्याच धुंधीत मश्गुल असलेल्या अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी त्याकडे दूर्लक्ष केले.

वायसीएममध्ये कार्यरत असलेल्या डॉ. विनायक पाटील यांनी अनेक राजकीय नेत्यांसह पालिकेसाठी साहित्य खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कंम्प्यूटराईज्‌ड रेडिओग्राफीचे कॅसेट खरेदी करण्यासाठी विनंती केली मात्र ही खरेदी किरकोळ असल्यामुळे तसेच आपल्याला अपेक्षित ‘खाद्य’ मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनीही दूर्लक्ष केले. या संपूर्ण प्रकाराचा रविवारी (दि.२५) कडेलोट झाल्याने एक्स रे यंत्रणाच कोलमडल्याने शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.

गरजेपेक्षा वेगळीच खरेदी

सन २०१८ सालापासून एक्स रे विभागाकडून कंम्प्यूटराईज्‌ड रेडिओग्राफीची खरेदी करावी यासाठी आग्रह धरला आहे. मात्र या खरेदीऐवजी अनावश्यक एक्स रे मशीनची खरेदी करण्यात आली. त्यामध्ये काही राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या. रुग्णांपेक्षा स्वस्वार्थाला महत्त्व देणाऱ्या या अधिकारी आणि राजकीय नेत्यांबाबत महापालिका आयुक्त काही भूमिका घेणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनावश्यक खरेदीऐवजी गरजेची आणि अत्यावश्यक खरेदी ही आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या आधारे खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ठेकेदाराने केले हात वर

महापालिकेला ९६ लाखांच्या एक्स रे मशीन पुरविणाऱ्या ठेकेदाराचा अभियंता रविवारपासून मशीन सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र अपुऱ्या ज्ञानाच्या आधारे सुरू असलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने या ठेकेदाराने हात वर केले आहेत. परदेशामध्ये असलेल्या अभियंत्यांशी मेल द्वारे संपर्क साधून त्यांची अपॉईंटमेंट घेऊ. त्यांनी अपॉईंटमेंट दिल्यानंतर मशीन सुरू करू इतकेच जुजबी उत्तर दिल्याने एक्स रेची यंत्रणा कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बेजबाबदारीचा कळस

महापालिकेच्या ‘पीजी’ महाविद्यालयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे वायसीएम रुग्णालयाची जबाबदारी सोपविल्यापासून या रुग्णालयातील कारभाराचे तीन- तेरा झाले आहेत. स्वत:ला स्वच्छ प्रतिमेचा असल्याचे दाखविण्याच्या प्रकारात स्वत:ला व्यस्त ठेवणाऱ्या डॉ. वाबळे यांच्या अनुभवहिन कारभाराचा करोना रुग्णांना फटका बसत असल्याचे या प्रकारामुळे समोर आले आहे.

आयुक्तांच्या कार्यशैलीवरही प्रश्नचिन्ह

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून सध्या कार्यरत असलेल्या आयुक्त राजेश पाटील यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे महापालिकेच्या खरेदीमधील भ्रष्टाचार काही प्रमाणात कमी झाला असला तरी त्यांच्या अपरोक्ष भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार सुरू आहेत. स्वच्छ प्रतिमेचा प्रपोगंडा जोपासण्यासाठी आयुक्तांनी कोणाचेच ऐकायचे न ठरविल्याचा फटका रुग्णांनाही बसत असल्याचे स्पष्ट होत आहे. स्वच्छ कारभार हा महत्त्वाचा घटक असला तरी रुग्णांची प्राथमिकता ही बाबही महत्त्वाची असल्याने आयुक्तांनी किमान विश्वासार्ह सहकाऱ्यांच्या माध्यमातून पालिकेचा कारभार अधिक गतीमान करण्याची गरज निर्माण झाली आहे.

होय, मशीन बंद पडली आहे

वायसीएम रुग्णालयातील पोर्टेबल एक्स रे मशीन बंद पडली असून आयसीयू आणि एसडीयू विभागातील रुग्णांचा रविवारी दुपारी चार वाजलेपासून एक्स रे काढण्यात आलेला नाही. डिजीटल एक्स रे मशीन सुरू आहे. गंभीर रुग्णांचे एक्स रे काढण्यात आलेले नसून उद्या (मंगळवारी) मशीन दुरुस्त झाल्यानंतर रुग्णांचे एक्स रे काढण्यात येतील.

डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता वायसीएम