उदयनराजेंना मंत्रीपद द्यायला हवे होते

उदयनराजेंना मंत्रीपद द्यायला हवे होते

मुंबई , (प्रबोधन न्यूज ) - केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार आले. मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपचे ६१ मंत्री आहेत. मित्र पक्षांचे फक्त ११ मंत्री आहेत. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला चांगले स्थान द्यायला हवे होते. विधानसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर आम्हाला सन्मान मिळायला हवा होता. उदयनराजे यांना तरी भाजपने मंत्री करायला हवं होतं. शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखायला हवा होता अशी खदखद शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला अवघे एकच मंत्रिपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाला फक्त राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटात प्रचंड असंतोष पसरला आहे. शिांदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या बाबतची जाहीर नाराजीही बोलून दाखवली आहे. एक दोन खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जातं अन् आम्हाला राज्यमंत्रीपद दिलं जातं हा दुजाभाव आहे. ही न्यायिक भूमिका नाही, अशी नाराजी व्यक्त करतानाच उदयनराजे यांना तरी भाजपने मंत्री करायला हवे होते.शिवाजी महाराजांच्या गादीचा मान राखायला हवा होता, असे श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना बारणे म्हणाले, भाजपने कुणाला मंत्रीपद द्यावं आणि कुणाला नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण उदयनराजे भोसले तिस-यांदा खासदार झाले आहेत. ते सीनिअर आहेत. गादीला मान मिळाला असता तर अभिमान वाटला असता. स्ट्राईक रेट चांगला आहे.

दादांना न्याय मिळायला हवा होता
अजितदादा गटाला एकही मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केले. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अजितदादांना न्याय मिळायला हवा होता. या राजकीय घडामोडीत अजितदादांनी कुटुंबाचा वाईटपणा आणि रोष घेतला आहे. त्यांनी भाजपसोबत जाण्याची धाडसी भूमिका घेतली. त्यामुळे एनडीएचे घटक म्हणून त्यांना न्याय मिळायला हवा होता, असेही ते म्हणाले.