विशाल अगरवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

विशाल अगरवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे , (प्रबोधन न्यूज )  - पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी विशाल अगरवालसह आणखी सहा जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पुणे पोलिसांनी केली होती, पण कोर्टाने ती फेटाळली आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोर्टाच्या या निर्णयामुळे आता विशाल अगरवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली. या दुर्घटनेत दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. कोर्टाने आता विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबतच सर्व सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे हायकोर्टात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात. या प्रकरणात विशाल अग्रवाल हे आजकिंवा उद्या जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही : फडणवीस
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र धंगेकर यांनी लिहिलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी असे पत्र पाहिले नसल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचे राजकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, ती सर्व कारवाई पोलिसांनी केली आहे. तसेच जुवेनाइल जस्टिस बोर्डाने चुकीचा निर्णय दिला होता, त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन तो निर्णय बदलून घेतला आहे. पहिल्यांदा पब चे मालक आणि मुलाचे वडील यांना ही अटक झाली आहे, कठोर कारवाई झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे हे योग्य नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.