*इतिहास कोळी चबुतऱ्याचा, आदिवासी समाजाच्या समर्पण वृत्तीचा*

*इतिहास कोळी चबुतऱ्याचा, आदिवासी समाजाच्या समर्पण वृत्तीचा*

*इतिहास कोळी चबुतऱ्याचा, आदिवासी समाजाच्या समर्पण वृत्तीचा*

गेल्या दहा वर्षांपासून आदिवासी बांधवांद्वारे एक आगळावेगळा कार्यक्रम दरवर्षी किल्ले शिवनेरी येथे संपन्न होतो आहे. तो म्हणजे महादेव कोळी चौथरा (काळा चबुतरा) यास अभिवादन करण्याचा कार्यक्रम होय.

समस्त जनजातीय अस्मितेची ज्योत पेटवणारा हा 'महादेव कोळी चबुतरा अभिवादन कार्यक्रम' सुरू करताना वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्राच्या (आत्ताचे जनजाती कल्याण आश्रम) समोर एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश होता. तो म्हणजे आदिवासी समाजातील महापुरुषांच्या राष्ट्रकार्यातील योगदानाची सर्वांना माहिती व्हावी, सर्वांनी मिळून कृतज्ञतापूर्वक त्यांचे स्मरण करत आपल्या समाजाच्या अस्मितेची ज्योत प्रज्वलित करावी. जी प्रेरणा आपल्याला आपल्याच इतिहासातून मिळाली आहे; कारण येथे स्वराज्य संपवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक बाह्य आक्रमकास भारतीयांकडून कडाडून विरोध झाला आहे. हा विरोध जसा राजा राजवाड्यांकडून झाला तसाच विरोध जनसामान्यांकडूनही झाला, अगदी एवढेच नाही तर देशातील पुढारलेल्या व मागासलेल्या सर्वच जाती जमातीतूनही तो विरोध प्रकट झाला आहे. हाच विरोध देशातल्या शहरी व ग्रामीण क्षेत्राबरोबरच डोंगरदऱ्यात, गिरीकंदरात राहणाऱ्या प्रत्येक समाज घटकांनी बाह्य आक्रमकांविरुद्ध केलेला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या
इतिहासात या विविध समाजघटकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची नोंद झालेली आहेच; पण ती पुरेशी नसल्यामुळे काही समाजघटकांच्या या अतुलनीय पराक्रमाची, शौर्याची प्रसिद्धी मात्र झाली नाही. अथवा नकळतपणे दिली गेली नाही असेही म्हणता येईल; आणि म्हणूनच अशा समाज घटकांच्या पराक्रमाचा, शौर्याचा, राष्ट्रीय योगदानाचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा व त्या समाजघटकांची अस्मिता जागृत करण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न जनजाती कल्याण आश्रम वर्षानुवर्ष करीत आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे शिवनेरी किल्ल्यावरील महादेव कोळी चबुतरा (काळा चबुतरा) अभिवादन कार्यक्रम होय.

या महादेव कोळी चबुतरा अभिवादन दिनाची माहिती घेण्यापूर्वी आपल्याला या कोळी चबुतऱ्यासी संबंधित असलेल्या महादेव कोळी जमातीच्या इतिहासाकडे जाणे काहीसे क्रमप्राप्त ठरते. स्वतःला महादेवाचे निस्सीम भक्त म्हणवणारी व आपण महादेवाचे वंशज असल्याचा सार्थ अभिमान बाळगत सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य पण दुर्गम परिसरात निवास करणारी महादेव कोळी ही जमात (शासकीय नोंद-कोळी महादेव) मुख्यतः पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये बहुसंख्येने व पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्याच्या पूर्वेच्या काही तालुक्यांमध्ये अंशत्वाने वसलेली आहे. सर्वांशी गुण्यागोविंदाने राहणारी, काहीशी अबोल असणारी, निसर्गाशी नाते ठेवून जीवन जगणारी, कुणाच्या फारशा अध्यात-मध्यात न पडणारी ही जमात होय. असे असले तरीही या समाजाचा इतिहास मात्र प्रचंड शौर्य व पराक्रमाने भरलेला आहे. मुळातच ही एक अत्यंत स्वाभिमानी व लढावू जमात आहे. यादव राजा सिंघन(कार्यकाल इस१२१०ते१२४७) यांजकडून महादेव कोळ्यांना भीमाशंकर देवस्थानाच्या मंदिर व्यवस्थेचे काम मिळाले पुढे सतराव्या शतकात सततच्या लढायांमुळे महादेव कोळ्यांनी तो अधिकार गुरव समाजाला दिला. पुढे पेशवाईत तो ब्राह्मणांना दिला गेला. एकूणच विविध ऐतिहासिक नोंदीमधून महादेव कोळ्यांचे अस्तित्व इतिहासात ठायीठायी ठळकपणे दिसते.
जन्मजात स्वतंत्र वृत्तीमुळे ही जमात राज्यकर्ती जमात म्हणून ओळखली जाते. उदाहरणच द्यायचे म्हटले तर प्रसिद्ध जव्हार संस्थान होय. १४ व्या शतकात जायबा मुकणे या महादेव कोळी वीराद्वारे महादेव कोळ्यांनी हस्तगत केलेले हे संस्थान.(एकूण क्षेत्रफळ पाच हजार चौरस मैल)भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारतीय संघराज्यात सामील झाले. अगदी बहामनी सत्ता(कार्यकाल सन१३४०ते१४९०) चालू असतानादेखील या बहामनी सत्तेने महादेव कोळी नाईकांचे, सरदारांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले होते; तर पुढे आदिलशाही व निजामशाही (कार्यकाळ सन १५४० ते १६३६ )राजवटीमध्ये देखील (सन १४४६ च्या अखेरीस पुणे परगण्यातील ५२ मावळ प्रदेश व कोळवन प्रदेशासह जव्हार राज्य सीमा भागातील)सर्व डोंगरी किल्ल्यांचे अधिपत्य हे महादेव कोळी समाजाकडेच असल्याचे दिसून येते. नव्हेतर तसे करण्यास या परकीय सत्तांना महादेव कोळ्यांनी भाग पाडले होते. कारण यांचा पराक्रम व शूरत्व आणि निडरतेमुळे, त्यांच्या सैनिकी स्वभाव आणि आजमितीस आदिवासी म्हणून  गणल्या गेलेल्या ठाकर, वारली, कोकणा, भिल्ल, मल्हार कोळी, कातकरी या जमातींना लढाईत सोबत घेण्याच्या व साहाय्य करण्याच्या वृत्तीमुळे त्यांचे राजकीय आणि सैनिकी उपद्रवमूल्य मोठे होते. याच उपद्रवमूल्याच्या भीतीपोटी सर्वच राजसत्ता यांच्या बरोबर अत्यंत नरमाईचे, सबुरीचे धोरण अंगीकारत होत्या हे इतिहासात स्पष्ट दिसते; तर पेशवाईत स्वहक्कांसाठी पेशव्यांच्या विरुद्ध अत्यंत हिरिरीने, त्वेषाने लढताना जसा हा राज्यकर्ता महादेव कोळी दिसतो, तसाच तो राष्ट्रीय अस्मितेचा विचार सतत डोळ्यांसमोर असल्याने सन १८१७-१८१८ दरम्यान इंग्रज सेनेचा सेनाधिकारी मॅकिंनटोश यांच्यापासून दुसऱ्या बाजीरावाचे संरक्षण करण्याचा प्रयत्नदेखील रतनगडाच्या युद्धात हा करतो. यांतून त्याचे दूरदर्शीपण लक्षात येते.

 महादेव कोळ्यांचा  स्वतःच्या सामर्थ्याचा आत्मविश्वास जबरदस्त व प्रखर होता सोबतच लढाईसाठीची ताकद व राजकरणातील महत्त्वपूर्ण दरारादेखील इतका होता की सन १८३९  रोजी त्यांनी इंग्रजांच्याविरुद्ध मोठा यशस्वी उठाव केला होता आणि लगोलग हे राज्य कोळ्यांच्या ताब्यात असलेची घोषणा केली होती. एवढेच करून हे थांबले नाहीत तर, दुसऱ्या बाजीरावास पुन्हा पेशवे म्हणून घोषित केले होते. म्हणूनच इंग्रजी राजवटीत यांच्या महान पराक्रमी प्रसंगांचे वर्णन जागोजागी दिसून येते. ज्यास अद्भुत असेच म्हणता येईल. रात्रीच्या गनिमी युद्धाच्या कलेत तर हे इतके पारंगत होते की, इंग्रजी राजवटीने त्यांना सोल्जर्स ऑफ नाईट अर्थात 'राजकोळी' अशी पदवी दिली होती. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातदेखील यांचा सक्रिय सहभाग होता. तो इतका महत्त्वपूर्ण होता की, यांच्या प्रतिकारासाठी इंग्रजांना यांचीच एक स्वतंत्र सैनिकी पलटण उभी करावी लागली होती. जी पुढे १८६१मध्ये विसर्जित केली गेली. पुढे भारतीय इतिहासात क्रांतिकारकांचा उदय झाला; आणि  सन १८७४ मध्ये महादेव कोळी समाजात वीर होनाजी केंगले हा क्रांतिकारक उदयास आला. हा योद्धा युद्धात इतका शूर, धाडसी, लढाऊ होता की, इंग्रजांनी आपल्या स्वसत्तेच्या या विरोधकास 'रिचर्ड' ही पदवी बहाल केली होती.(जी पदवी इंग्लडच्या राजास दिली जायची.) इतका तेजस्वी ओजस्वी असा यांचा इतिहास आहे. महादेव कोळ्यांमधील ही तेजस्वी क्षत्रिय वृत्ती नष्ट व्हावी व यांचा उपद्रव होऊ नये म्हणून विशेष प्रयत्न करत इंग्रजांनी सन १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजी सैन्य पलटणीत यांना सहभागी करून घेतले नाहीच आणि अगदी भारत देश सोडून जाईपर्यंत ह्या बाबीचे त्यांनी शेवटपर्यंत पालन केले, इतकी या समाजाची ताकद होती, दहशत होती.

एकूणच जेथून महाराष्ट्राचा इतिहास स्पष्टपणे, नीटपणे मांडता येतो, दिसतो अगदी तेथूनच या जमातीचा इतिहास सुरू होतो आणि जो भारतभूमीला स्वातंत्र्य मिळेपर्यंत तो आपले अस्तित्व सतत ठळकपणे दर्शवत राहतो, ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे.
अशा या महादेव कोळ्यांच्या याच गौरवपूर्ण शौर्याची साक्ष देणारी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे सन १६५० मध्ये मोगलांनी केलेला शिवनेरी किल्ल्यावरचा हल्ला होय. हिंदवी स्वराज्यावर तुटून पडणाऱ्या मोगलांना शिवनेरी किल्ल्यावर सामना करावा लागला, तो शिवाजी राजांना आपला राजा मानणाऱ्या तेथील शिवभक्त महादेव कोळी योद्ध्यांसी. मात्र सैन्य संख्येच्या अभावामुळे, अपुऱ्या शस्त्रास्त्र बळामुळे आणि बाह्य मदत न मिळाल्यामुळे सन १६५० साली शिवनेरी किल्ल्यावरील अस्तित्वाच्या लढाईत मुघल सत्तेकडून महादेव कोळी हे खेमा नायकाच्या नेतृत्वात पराभूत झाले. या सर्व दीड हजार महादेव कोळी सैनिक वीरांची मोगलांनी अमानुषपणे कत्तल केली. एवढेच नाही तर अमानुषतेचा कळस म्हणजे या दीड हजार वीरांची मुंडकी छाटून त्यांना एकत्र गाडले व त्या मुंडक्यांच्या राशीवर एक चबुतरा बांधला. ज्यास कोळी चबुतरा (काळा चबुतरा) म्हणून ओळखले जाते. एवढेच नाही तर याचबरोबर या परिसरातील अनेक लढवय्ये महादेव कोळी वीरांना ठिकठिकाणाहून पकडून एकत्र आणून त्यांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी कत्तली केल्याचाही उल्लेख आढळतो. या सामूहिक हत्याकांडात महादेव कोळ्यांबरोबरच या क्षेत्रात निवास करणाऱ्या ठाकर, पारधी, कातकरी या जमाती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याबाबत इतिहास मौन झाल्याचेच आढळते. अर्थात ही प्रख्यात लढाई महादेव कोळी जरी हरले असतील, तरीही आजच्या स्थितीत हीच लढाई महादेव कोळी जमातीच्या आणि इतर सर्वच आदिवासींच्या 'एक तीर एक कमान, सब आदिवासी एक समान' या नात्याने आदिवासी अस्मितेचा स्फुल्लिंग बनली आहे यात शंका नाही.

याच महादेव कोळी चौथरा अभिवादन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शूर अशा पूर्वजांना पितृपक्षात तर्पण देऊन अभिवादन करण्यासाठी व त्यांचा गौरवपूर्ण इतिहास समाजापुढे मांडून त्यांच्या स्मृती जागवण्याचे हे प्रेरणादायी कार्य आज सफल होत आहे.
असे असले तरी शिवनेरी किल्ल्यावरील महादेव कोळ्यांच्या बलिदानाच्या घटनेची निश्चित तारीख माहिती नसल्यामुळे त्यांचे स्मरण करण्याचा दिवस कोणता? व या इतिहासाच्या प्रसिद्धीची योजना कशी करावी हा प्रश्न मात्र तत्कालीन वेळी वनवासी कल्याण आश्रमासमोर उभा राहिला होता. अशा वेळी हिंदू धर्मात आपल्या तेजस्वी अस्तित्वाच्या खुणा उमटवणाऱ्या आदिवासी बांधवांच्या गौरवशाली पूर्वजांच्या स्मरण दिवस निवडताना मार्कंडेय पुराणानुसार आपण ज्या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजांचे स्मरण करत असतो, व या काळात त्यांचे पृथ्वीवर अस्तित्व असते, या श्रद्धेने त्यांना नैवद्य अर्पण करत असतो; तर शास्त्राप्रमाणे मृत्यू पावलेल्या पूर्वजांची (पितरांची) मृत्युतिथी माहीत नसल्यास सर्वपित्री अमावस्येच्या म्हणजेच भाद्रपद कृष्ण अमावस्येच्या वेळेस आपण त्यांचे पुण्यस्मरण करतो, श्राद्ध विधी वा नैवेद्य अर्पण करतो. हा सर्व विचार डोळ्यांसमोर ठेवून, या योद्ध्यांचे वीरगती प्राप्त होण्याच्या प्रसंगाचे वेगळेपण लक्षात घेत स्थानिक सण परंपरेचा विचार करून या योद्ध्यांच्या स्मरणाचा, अभिवादनाचा कार्यक्रम हा भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घेण्याची परंपरा पहिल्यांदा सन २०१२ सालापासून वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रने महादेव कोळी विकास प्रबोधिनी जुन्नर व अनेक राजकीय पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेत संयुक्तपणे सुरू केली. जी आजपर्यंत संस्थेच्या वतीने अव्याहत पणे सुरू आहे. दरवर्षी भाद्रपद चतुर्दशीला सुरुवातीच्या परंपरेप्रमाणे अत्यंत छोटासा असा स्वर्गीय वीरांना (पितरांना) नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम मोजक्या व्यक्तींसह केला जातो.

वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्रला अभिप्रेत असल्याप्रमाणे आज घडीला या अभिवादन कार्यक्रमात महादेव कोळी जमातीसह, सर्वच आदिवासी संघटना, संस्था, राजकीय व सामाजिक मंडळी सहभाग घेत असून अशा मोठ्या स्वरूपातील सार्वजनिक कोळी चबुतरा अभिवादन कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी  सर्वांना सोईची होईल अशी तारीख निवडून हा अभिवादन कार्यक्रम सकल आदिवासी समाज संघटना म्हणून  यशस्वीपणे आयोजित केला जातो आहे. या वर्षी असा  सार्वजनिक कार्यक्रम नुकताच ०३ सप्टेंबरला  हजारोंच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील विविध अनुसूचित जमातीच्या जवळजवळ ७८ संघटनांच्या सामूहिक एकीतून जुन्नर येथे भव्य आणि स्फूर्तिदायी अशा वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला ह्याचीही नोंद घेणे आवश्यक आहे.

एकूणच,
या कार्यक्रमाच्या निमित्ताने  सामाजिक अस्मितेचा स्फुल्लिंग पेटवत पुन्हा एकदा स्वसमाजाला स्वतःच्या पूर्वजांसारखे पराक्रमी शौर्यशाली व इतिहास घडविणारा असा बलशाली समाज बनवण्याच्या हाती घेतलेल्या या कार्यास आपल्याद्वारे विधायक कामाची जोड देत, आपले हक्क मिळवताना कर्तव्याचा विसर न पडू देता समाजाला विघातक ठरणाऱ्या व फूट पडणाऱ्या अन्य कोणत्याही विचारधारेच्या प्रवाहात प्रवाहपतित न होता, आपल्या शूर पूर्वजांच्याद्वारे निर्मित जनमान्य परंपरांचे पालन करीत हे कार्य पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व जनजातीय समाजबांधवांना, सामाजिक संघटनांना व नेते मंडळींना महादेव कोळी चौथरा स्मृती अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्ताने मनःपूर्वक धन्यवाद!

*- युवराज लांडे*
इतिहास अभ्यासक 
जुन्नर, पुणे.

भ्रमणध्वनी -
९९२१७१६९३५