हे आहेत ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी....

आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. 10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हे आहेत ‘महाराष्ट्र भूषण’चे मानकरी....

मुंबई - गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात 2021 रोजीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मविभषण आशा भोसले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आतापर्यंत 19 जणांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. तर मग जाणून घेऊया कोण आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’..

महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची ओळख आहे. महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्यास असलेल्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा सर्वोच्च बहुमान दिला जातो. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या  क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते.  10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचे स्वरुप होते. आता या पुरस्काराची रक्कम वाढविण्यात आली असून पुरस्कार रक्कम 25 लाख रुपये करण्यात आली आहे.

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल.देशपांडे

साहित्यक्षेत्रातील भरीव योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने 1997 साली पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना प्रदान करण्यात आला. मराठी लेखक, नाटककार, नट, कथा आणि पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना अवघा महाराष्ट्र पु.ल.देशपांडे म्हणूनच ओळखतो.

लता दीनानाथ मंगेशकर

आपल्या सर्वांना परिचित असलेल्या दीदी आणि भारतीय चित्रपट संगीताला अतिशय वरच्या दर्जावर नेण्याचं काम लता मंगेशकर यांच्या असामान्य आवाजाने केले. म्हणूनच भारतीय चित्रपट संगीतात लता मंगेशकर यांचे स्थान अजोड आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबददल महाराष्ट्र शासनाने कला आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन 1998 मध्ये लता दीनानाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दैऊन गौरव केला. केंद्र सरकारनेही 2001 साली लता मंगेशकर यांचा भारतरत्न देऊन सन्मान केला आहे.

डॉ.विजय पांडुरंग भटकर

परम महासंगणकाचे जनक अशी ओळख असलेले डॉ. विजय पांडुरंग भटकर हे महाराष्ट्रातील मुरंबा या गावचे.  डॉ. विजय भटकर यांनी माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक कीर्ती मिळविली. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान 2000 मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी सन 1999 मध्ये विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानाही डॉ.भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

सुनील मनोहर गावस्कर

सुनील मनोहर गावसकर यांना आपण ओळखतो ते भारताचा महान क्रिकेटर म्हणून.   फलंदाजीतल्या तंत्रशुद्धतेचा अंतिम शब्द म्हणजे सुनील गावसकर, एकाग्रतेचा महामेरू म्हणजे सुनील गावसकर. कसोटी सामन्यांच्या रणांगणात दहा हजार रन्सचा पल्ला ओलांडणारा पहिला फलंदाज. सर्वाधिक कसोटी शतकांचा विक्रम जवळजवळ वीस वर्षे मिरवणारा फलंदाज. सन 2000 मध्ये सुनील गावस्कर यांना त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सचिन रमेश तेंडुलकर

गेली जवळपास अडीच दशके भारतासह जगातील कोट्यवधी क्रिकेट रसिकांना आपल्या खेळाने परमानंद देणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकर यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा सन 2001 चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. 2014 मध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

पं.भीमसेन गुरुराज जोशी

लहानपणापासूनच संगीताचा ओढा असलेल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना महाराष्ट्र शासनाने सन 2002 मध्ये संगीत क्षेत्रात बहुमूल्य योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला. 60 वर्षाहून अधिक काळ संगीतात योगदान देणाऱ्या पंडितजींनी त्यांच्या गुरुजींच्या नावाने सवाई गंधर्व महोत्सव सुरु केला.  आज राज्य शासन पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने संगीत शिष्यवृत्ती देते.पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने 2008 मध्ये गौरविण्यात आले आहे.

डॉ.अभय बंग आणि डॉ.राणी बंग

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. समाजप्रबोधन या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देण्यासाठी 2003 साली या दाम्पत्याला महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले. गडचिरोलीसारख्या मागास भागात जाऊन तेथील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या या डॉक्टर्सनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय मेडिकल जर्नल्सना घ्यावी लागली आहे.डॉ. अभय आणि राणी बंग यांचं काम एखाद्या रुग्णालयापुरतं सीमित न राहता, खेड्यापाड्यांत, देशा-परदेशात उपयुक्त ठरत आहे यातच त्यांच्या कामाचे यश आहे.

डॉ.मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटे

मुरलीधर देवीदास आमटे यांना त्यांच्या घरातच त्यांना लहानपणी बाबा म्हटले जायचे आणि एका क्षणी कुष्ठरोग्यांसाठी जीवन वेचण्याचा निर्णय घेऊन हा मुरलीधर लाखो कुष्ठरोग्यांना आपलासा वाटणारा ‘बाबा’ झाला. अनेकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करणारे बाबा सदैव आपल्या कर्तव्य पथावर एका कर्मवीर योद्ध्याप्रमाणे अथक लढले. कुष्ठरोग्यांच्या सेवेचे व्रत अंगीकारले. 2004 साली महाराष्ट्र शासनाने समाज प्रबोधनासाठी डॉ. मुरलीधर आमटे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला.

डॉ.रघुनाथ अनंत माशेलकर

अतिशय कष्टाने, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत विज्ञान व संशोधन क्षेत्रातील अत्युच्च पदे डॉ. माशेलकरांनी यशस्वीपणे भूषविली आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉ.रघुनाथ माशेलकर हे भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. यांनी भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य केले आहे. 2005 मध्ये विज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. माशेलकर यांना महाराष्ट्रभूषण देऊन त्यांचा सन्मान केला.

रतन टाटा

राज्याच्या विकासात टाटा समूहाचे मोठे योगदान आहे. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटा यांना उदयोग क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2006 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

रामराव कृष्णराव ऊर्फ रा.कृ.पाटील

भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी आय.सी.एस. सेवेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मध्य प्रांतात आमदार म्हणून काम केले होते. तसेच विविध खात्यांचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. जवाहरलाल नेहरूंनी स्थापन केलेल्या पहिल्या प्लॅनिंग कमिशनचे श्री. पाटील सदस्य होते. ऐतिहासिक नागपूर करारावर त्यांनी सही केली होती. त्यांनी स्वतःला सक्रिय राजकारणातून निवृत्त होऊन समाजसेवेला वाहून घेतले होते. त्यांचे वयाच्या 99व्या वर्षी, 31 मे, 2007 रोजी निधन झाले. त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर 2007 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

नारायण विष्णू ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी

नारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी हे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रांत निरलसपणे कार्य केले. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत. समाजप्रबोधनासाठी 2008 साली महाराष्ट्र शासनातर्फे श्री. धर्माधिकारी यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

मंगेश केशव पाडगावकर

मंगेश केशव पाडगांवकर  यांना 2008 साली महाराष्ट्र शासनाने साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबददल महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. सलाम या कवितासंग्रहासाठी त्यांना 1980 साली साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेली प्रेम म्हणजे प्रेम असतं ही कविता खूप गाजली. साठहून अधिक वर्षांच्या लेखन कारकिर्दीत पाडगावकरांनी इतर भाषांतील साहित्यकृतींचे अनुवादही भरपूर केले.

सुलोचना लाटकर

मराठी-हिंदी सिनेमांतून सोज्वळ भूमिका रंगवणा-या अभिनेत्री सुलोचना यांचा चेहरा आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. पासष्टहून अधिक वर्षाच्या कारकिर्दीत कलाकार-दिग्दर्शक-तंत्रज्ञांच्या अनेक पिढय़ांबरोबर त्यांनी काम केले आहे. मराठी चित्रपटात बहुमूल्य योगदान देणाऱ्या सुलोचना लाटकर यांना 2009 मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार दिला.

डॉ.जयंत विष्णू नारळीकर

जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, ‘विज्ञाननिष्ठा’ हे मूल्य भारतात रूजवण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे विज्ञान-प्रसारक आणि अभिमानाने मराठीत लेखन करणारे  ज्येष्ठ वैज्ञानिक-लेखक अशी डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख आहे. विज्ञानातील सिद्धांत आपल्या लेखणीतून, व्याख्यानातून त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. ‘आकाशाशी जडले नाते’ हे त्यांचे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. मराठी विज्ञानकथेचे ते प्रणेते आहेत. 2010 मध्ये विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिला.

डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर

बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणाऱ्या डॉ. अनिल काकोडकर यांना भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार मानले जाते. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ डॉ. काकोडकर अध्यक्ष होते. 2011 मध्ये डॉ. काकोडकर यांना विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला.

बाबासाहेब पुरंदरे

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन केले आहे.  पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य आहे. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्यांपुढे ‘जाणता राजा’च्या माध्यमातून नेण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे.2015 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

आशा भोसले

आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी आणि गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांना संगीत आणि नाटकाचा वारसा लाभला.  बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली असून आतापर्यंत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत.सन 2021 या वर्षीचा पुरस्कार श्रीमती आशा भोसले यांना जाहीर झाला असून 24 मार्च 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी

आप्पासाहेब धर्माधिकारी, जन्मनाव दत्तात्रेय नारायण, हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत. नाना धर्माधिकारींच्या पावलावर पाऊल टाकत, अप्पासाहेब महाराष्ट्रात अनेक वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, निशुल्क वैद्यकीय शिबीर, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रमांच्या आयोजनास कारणीभूत ठरले. 2014 मध्ये डॉ. डी वाय पाटील विद्यापीठ, नेरुळने त्यांना विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केले. 2017 मध्ये, ते चौथा, पद्मश्रीने सन्मानित झाले. सन 2022 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे.