'कोरोना’मुळे जगभराममध्ये आर्थिक असुरक्षितता - अजित डोभाल

पुणे - जागतिक सुरक्षेचं स्वरूप बदलत असून गेली दोन वर्षे जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. यामुळे जगभरात असुरक्षितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत बिग डेटा चोरी, आर्थिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. देशाच्या सुरक्षेला जैविक संकटामुळे तसच समाज माध्यम, डिजिटल प्लॅटफॉर्म यामुळे धोका संभवतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केले.
पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या वतीने ‘राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या उद्घाटन समारंभात डोभाल बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संशोधक रघुनाथ माशेलकर, एअर मार्शल (नि) भूषण गोखले, लेफ्टनंट जनरल पाटणकर उपस्थित होते. डोभाल म्हणाले की, हवामान बदल यामुळे पण देशाच्या सुरक्षेला धोका संभवतो. नैसर्गिक संकट आणि महामारी याचा सामना कोणताही एक देश एकटा करू शकत नाही. यासाठी एकत्र येऊन सामना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भारत आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सहकार्य वाढवत आहे. बिमस्टक, शांघाय सहकार्य परिषद, क्वाड यासारख्या संघटनांमध्ये भारताचा सहभाग आहे. हवामान बदल, प्रदूषण, पर्यावरणाचा असमतोल यामुळे राहणीमान खालावले आहे. यासाठी निसर्गाचं संरक्षण करणे आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण हे भारत सरकारचं धोरण असून त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे ग्लासगो परिषदेमध्ये भारत सहभागी होणार असल्याचे डोभाल यांनी या वेळी सांगितले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं महत्त्वाचं
भविष्यात अशी संकटं रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न होणं आवश्यक आहे. यासाठी राजकीय स्तरावर पण योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद पण करायला पाहिजे. महामारी संकट रोखण्यासाठी जिल्हा स्तरावरील आणि प्राथमिक स्तरावरील आरोग्य सुविधा सक्षम करायला हव्यात. या ठिकाणी पण चाचणी आणि उपचारांच्या आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचं आहे आणि त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण महत्त्वाचं आहे. पर्यावरण, प्राणी आणि मानव यांचा संबंध असल्याने त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे आवश्यक आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करता येईल. आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून माध्यमांना पण प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे असे स्वामिनाथन म्हणाल्या.