बांगलादेशातून हिंदूंना हुसकावण्याचा कट; दोषींविरुद्ध कारवाईची आरएसएसची मागणी

बांगलादेशातून हिंदूंना हुसकावण्याचा कट; दोषींविरुद्ध कारवाईची आरएसएसची मागणी


धारवाड - बांगलादेशात काही दिवसांपूर्वी हिंदूंवर झालेले हल्ले हे त्यांना तेथून हुसकावण्याचा कट हाेता, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केला आहे. कर्नाटकच्या धारवाडमध्ये संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या तीनदिवसीय बैठकीत याबाबत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात म्हटले आहे की, बांगलादेशात अल्पसंख्यकांचा सफाया आणि त्यांना बेदखल करण्याचा मोठा कट रचला जात आहे.  याबाबत जाणूनबुजून खोट्यानाट्या बातम्या चालवण्यात आल्या तसेच धार्मिक संघर्ष निर्माण करण्यात आला.

सहसरकार्यवाह अरुणकुमार म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारत सरकारकडे आग्रह केला आहे की, बांगलादेशात झालेले हल्ले आणि मानवी हक्क उल्लंघनाच्या बाबतीत राजकीय माध्यमांतून जगभरात माहिती पोहोचवण्यात यावी. हल्ल्याची चौकशी करून दोषींविरुद्ध कठाेर कारवाई केली जावी. अरुणकुमार पुढे म्हणाले, जगभरातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलावीत तसेच बांगलादेश सरकारशीही चर्चा करावी.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही दिवसांपूर्वी उपद्रवींकडून बांगलादेशातील दुर्गा मंडपांना निशाणा बनवण्यात आले होते. अनेक ठिकाणी समाजकंटकांनी मंडपांवर हल्ले केले होते. या हिंसाचारात चार हिंदूधर्मीयांचा मृत्यू झाला होता. तसेच त्यात शेकडो जण जखमी झाले होते. बांगलादेशात प्रख्यात इस्कॉन मंदिरावरही उपद्रवींकडून हल्ला करण्यात आला होता. यात एका भाविकाचा मृत्यू झाला होता.