फाल्गुनी नायर कशा बनल्या जगातील श्रीमंत महिलांपैकी एक ? 

फाल्गुनी नायर कशा बनल्या जगातील श्रीमंत महिलांपैकी एक ? 
नवी दिल्ली -
यावर्षी भारतातील महिलांनी उत्कृष्ट कामगिरी करून जगभरात नाव कमावले आहे.  आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत जिने सर्वात श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवून हे सिद्ध केले आहे की खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीने महिलांचेही कर्तृत्व आहे. या महिलेचे नाव आहे 58 वर्षीय फाल्गुनी नायर, जिची कंपनी सध्या देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. चला, जाणून घेऊया, त्यांच्या सुप्रसिद्ध ब्रॅंडबद्दल! 
फाल्गुनी नायर या 'नायका' या सुप्रसिद्ध ब्रॅण्डच्या जनक !  फाल्गुनी यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1963 रोजी मुंबई येथे झाला.  त्यांचे वडील गुजराती असून ते बेअरिंगचा व्यवसाय करायचे, तर आईनेही वडिलांच्या व्यवसायात मदत केली.  फाल्गुनी यांच्या पतीचे नाव संजय नायर असून दोघांचेही लग्न 1987 मध्ये झाले होते.  फाल्गुनी नायर आणि संजय नायर यांना दोन जुळी मुलं आहेत.
फाल्गुनी नायर एक भारतीय महिला उद्योजक आणि ब्यूटी स्टार्टअप 'नायका' (Nykaa) च्या संस्थापक आहेत. या बिजनेसमुळे त्या आता 6.5 अब्ज डॉलरच्या मालकीण आहेत.  माजी इन्व्हेस्टमेंट बँकर फाल्गुनी नायर यांनी 'नायका' ची सुरुवात 2012 मध्ये केली होती.  कंपनी आतापर्यंत 1,200 ब्रँड्सशी निगडीत आहे, जे मेकअप, स्किन केअर, हेल्थ, हेअरकेअरशी संबंधित आहेत.
मल्टी-ब्रँड ब्युटी प्रोडक्ट स्टोअर्सना भेट देताना फाल्गुनी नायर यांना 'नायका' ची कल्पना सुचली.  सर्व काही मिळेल असे एकही दुकान नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी असे दुकान बनवले, जिथे अगदी सगळं काही मिळेल.  त्यांच्या विचारसरणीने त्यांना आज जगात नवी ओळख दिली आहे.  जगातील लोकप्रिय मासिक फोर्ब्सच्या 2021 च्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत नायरचे नाव देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
2012 मध्ये सुरू झालेले नायका आज देशातील सौंदर्य प्रसाधन उत्पादनांचे सर्वात मोठे ऑनलाइन व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे.  नायकाद्वारे, तुम्ही तुमच्या फोनवरून सर्व ब्रँडची उत्पादने पाहू शकता आणि त्यांना घरबसल्या ऑर्डर करू शकता.  आज या प्लॅटफॉर्मवर दर मिनिटाला ३० हून अधिक मेकअप उत्पादने विकली जातात.