शिंदे गटाने व्हिप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ – सुनिल प्रभू

शिंदे गटाने व्हिप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ – सुनिल प्रभू

मुंबई - शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. यावरून आता राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय. “आम्हाला अजुनही कोणताच व्हीप प्राप्त झालेला नाही” असा खुलासाच सुनील प्रभू यांनी केलाय.

“निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झालेली नाही. तोपर्यंत दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना कोणतीही कारवाई न बजावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही जर शिंदे गटाने व्हिप बजावला तर आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊ” असं देखील सुनील प्रभू म्हणाले.

तर दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील यावर स्पष्टीकरण देत आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आम्ही अधिवेशनात पूर्णवेळ हजर राहण्याचा व्हीप बजावला आहे. सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत. त्यांचे आदेशाचं तंतोतंत पालन केलं जात आहे. अधिवेशनाला हजर राहण्याचा आदेश ही कारवाई होत नाही. त्यांनी सगळ्यांनी अधिवेशनाला हजर राहावं यासाठीचा हा व्हीप आहे.”, असं उदय सामंत म्हणाले.