महाराष्ट्रात ओमिक्रॉनसंदर्भात केंद्राप्रमाणेच निर्णय घेणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे 

महाराष्ट्रात ओमिक्रॉनसंदर्भात केंद्राप्रमाणेच निर्णय घेणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे 
जालना -
कर्नाटकात ओमिक्रॉनची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं मोठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई विमानतळावर आतापर्यंत 800 जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 28 जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अलीकडच्या एक महिन्यात बाहेरील देशातून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्याचं काम सुरू असून कर्नाटक सीमेवर सध्या कोणतेही निर्बंध घातले जाणार नाही. केंद्र सरकार घेईल त्या निर्णयाप्रमाणे राज्य निर्णय घेईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केले आहे.

मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात 12 तर पुण्यातील लॅबमध्ये 16 असे एकूण 28 नमुने जिनोमिक सिक्वेसिंग साठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अजून आले नाहीत. त्यामुळे या नमुन्यांचे अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नसल्याचंही टोपे म्हणाले.

एक  नोव्हेंबरनंतर राज्यात आलेल्या विमान प्रवाशांची यादी घेण्यात आली आहे. त्यांचं सर्व्हेक्षण करण्याचं काम सुरू असून त्यांच्या संपर्कात आळलेल्याची तपासणी सुरु असल्याचं टोपे यांनी सांगितलं.