राधिका आपटे दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत; ‘मिसेस अंडरकव्हर’ ओटीटीवर रिलीज होणार!

अनुश्री मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मिसेस अंडरकव्हर’ या चित्रपटामध्ये राधिका आपटे ही दुर्गा नावाच्या एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राधिकासोबतच सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

राधिका आपटे दिसणार गुप्तहेराच्या भूमिकेत; ‘मिसेस अंडरकव्हर’ ओटीटीवर रिलीज होणार!

बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच वेगवगेळ्या भूमिकेत दिसते. आता देखील अभिनेत्री अशा एका हटके भूमिकेत दिसणार आहे. महिला दिनाचे निमित्त साधत राधिकाने तिच्या आगामी चित्रपटाची ‘मिसेस अंडरकव्हर’ची घोषणा केली आहे. राधिका आपटे या चित्रपटात ‘मिसेस अंडरकव्हर’ बनणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुमीत व्यास, राजेश शर्मा आणि साहेब चटर्जी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट ‘झी ५’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘मिसेस अंडरकव्हर’ ही एका साध्या भारतीय गृहिणीची धमाल, आजच्या काळाची ॲक्शन-पॅक्ड आणि मनोरंजक कथा आहे. ‘मिसेस अंडरकव्हर’ ही एक स्पेशल अंडरकव्हर ऑफिसर आहे आणि तिला १० वर्षांनी एका विशेष कामासाठी पाचारण करण्यात आले आहे. पण, या १० वर्षांत ती अंडरकव्हर एजंटचे सर्व पैलू विसरून गेली आहे. कारण तिने तिचा सगळा वेळ एक आदर्श गृहिणी होण्यासाठी दिला आहे. ती तिच्या सासू-सासऱ्यांची, मुलाची आणि पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी असलेल्या पतीची सेवा करत आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राधिका आपटे म्हणाली की मिसेस अंडरकव्हरच्या कथेच्या प्रेमात ती लगेच पडली कारण ती गृहिणींबद्दलच्या पितृसत्ताक गृहितकांना मिश्कीलपण सामोरी जाते. चित्रपटातील दुर्गा या तिच्या पात्राने तिचे मन जिंकले. यातील दुर्गा ही मनोरंजक, दयाळू, प्रामाणिक, भोळी आणि स्वतःबद्दल अनिश्चित आहे. स्वतःची ताकद शोधण्याचा तिचा प्रवास हा चित्रपटाचा विषय आहे. 'प्रत्येक कुटुंबात एक दुर्गा असते - एक स्त्री जी शांतपणे तिची कर्तव्ये पार पाडते. परंतु तिला कमी लेखले जाते कारण तिला फक्त गृहिणी मानले जाते,' असे राधिका आपटे म्हणाली.

राधिकाने एका निवेदनात म्हटले आहे की हा चित्रपट आपल्या पितृसत्ताक समाजातील मानसिकतेचा सामना करतो आणि विनोदाच्या नावाखाली ते सुंदरपणे सादर केले केले आहे. राधिका आपटेसोबत, राजेश शर्मा मिसेस अंडरकव्हरमध्ये दुर्गाला कामावर घेणार्‍या स्पेशल फोर्सच्या नेत्याच्या भूमिकेत आहेत आणि सुमीत व्यास खलनायकाच्या भूमिकेत आहे. मिसेस अंडरकव्हरमध्ये नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल व्यास यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच पॅडमॅन, मोनिका ओ माय डार्लिंग, अंधाधूंद यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिचं लग्न सुरुवातीला सिक्रेट ठेवलं. मात्र, काही काळानंतर तिने आपल्या लग्नाबाबत जाहीर कबुलीही दिली होती. राधिका चित्रपट आणि वेब सीरिजमधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या नव्या चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

https://www.youtube.com/watch?v=tB6J9GDiBB4