'कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करा'- मुख्यमंत्री   

'कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करा'- मुख्यमंत्री   

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - कामगारांची सुरक्षा आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत कारखान्यांच्या ठिकाणी ‘कोविड दक्षता समिती’ स्थापन करण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. गेले वर्ष ते सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाशी लढत आहोत. येत्या वर्षभरात कोविड संसर्गाशी मुकाबला करीत असताना राज्यातील उद्योगधंदे सुरू राहण्याबरोबरच राज्याचे अर्थचक्र सुरू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे कामगारांचे हित समोर ठेवून ही समिती स्थापन करण्यात यावी, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील कामगार संघटनांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत शेतकरी वर्गाबरोबरच कामगारांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीचे ते आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळेच या कामगार वर्गाची काळजी घेण्यासाठी राज्य शासन एकत्रितपणे प्रयत्न करीत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कोविड विरोधातील लढाईत कुठेही मागे नाही. मात्र कोविड विरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक असून, कामगार संघटनांनी कोविड विरोधी लढाईत राज्य शासनाला संपूर्ण सहकार्य करावे. कामगारांची सुरक्षा याला प्राधान्य देत असताना कामगारांना कंपनीच्या आवारात तात्पुरते राहण्याची सोय करता येईल का, कामगारांच्या शिफ्ट कशा करता येतील यासाठी कामगार संघटनांनी पाठपुरावा करावा.

आताच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गाला संसर्ग अधिक होताना दिसत असल्याने 1 मेपासून राज्यात 18 ते 14 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण यावर भर देण्यात येणार आहे. विविध कामगार संघटनांनी पुढाकार घेऊन कारखानदारांमार्फत कामगारांचे लसीकरण होईल, यासाठी पाठपुरावा करावा. कारखानदारांनी कामगारांची आरटीपीसीआर तपासणी कंपनीत करण्याबरोबरच त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष तयार करण्यासाठीही पुढाकार घ्यावा, यासाठी कामगार संघटनांनी प्रयत्न करावेत. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना रोजगार मिळेल यासाठीही संघटनांनी प्रयत्न करावेत.

येत्या काळात कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोविडचा संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा काही हजार खाटांची व्यवस्था होती. आता मात्र या खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. आज राज्यातील कोविडचा संसर्ग पाहता ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर औषधांचा तुटवडा भासत आहे.