परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

मुंबई -
ठाण्यापाठोपाठ आज मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. गोरेगाव पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकाने दाखल केलेल्या खंडणीच्या गुह्याप्रकरणात पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली होती.
बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीवरून परमबीर सिंह यांच्यासह बडतर्फ एपीआय सचिन वाझे तसेच सुमित सिंग, अल्पेश पटेल, विनय सिंग आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, तो गुन्हा पुढील तपासाकरिता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट-11च्या पथकाने या प्रकरणाशी संबंधित हवाला ऑपरेटर अल्पेश पटेल याला अटक केली होती. याप्रकरणी परमबीर सिंह यांची चौकशी करायची आहे.
त्यासाठी गुन्हे शाखेने परमबीर सिंह यांच्या मुंबई आणि चंदिगड येथील घरांवर समन्स बजावून हजर राहण्याबाबत सांगितले होते. मात्र तरी परमबीर सिंह चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयात परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याबाबत विनंतीअर्ज दाखल केला होता. त्यानुसार दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले.