2024 ला दिल्लीतील चित्र वेगळं असेल - खासदार संजय राऊत

पुणे -
पुढील लोकसभा निवडणुकीनंतर 2024 ला दिल्लीतील चित्र संपूर्ण बदललेलं असेल. केंद्रातील एकपक्षीय सरकार संपेल आणि परत एकदा आघाडी सरकारचा काळ सुरू होईल, असे प्रतिपादन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी खासदार राऊत यांनी एनसीबी, ईडी, केंद्रातील सरकार, आगामी निवडणुका आदी मुद्दय़ांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली.
केंद्रात 2024 ला विरोधकांचे स्थान कसं असेल आणि काँग्रेसला मध्यवर्ती ठेवून आघाडी होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, या देशातील कोणतीही आघाडी ही काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवून होऊ शकत नाही. काही राज्यांत त्यांची सरकारे नाहीत. काही राज्यात त्यांचा पक्ष अगदी कमकुवत असला तरी देशभरात पाळेमुळे रुजलेला काँग्रेस हा आजही एकमेव पक्ष आहे. बाकी सर्व प्रादेशिक पक्ष आहेत.
उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या भूमिकेबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, आम्ही सध्या दादरा नगर हवेलीला निवडणूक लढवत आहोत. गोव्यात काम चालू आहे. यूपीमध्येही काम चालू आहे. मात्र, त्याला आणखी वेळ आहे. पण, नक्की लढू, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता
देशात भविष्यात आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो का, या प्रश्नावर उत्तर देताना खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे मी नेहमीच सांगत आलो आहे, असे उत्तर त्यांनी देताच ते पंतप्रधान होऊ शकतात का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर राष्ट्रीय नेतृत्वाचा अर्थ तुम्ही कशाप्रकारे घेता, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. तुम्हाला माझ्याकडून नेमके काय उत्तर पाहिजे. तुम्हाला उद्या काय हेडिंग हवंय, ते मी देतो, असे त्यांनी सांगितले.