राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश


विरार - तलासरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली असून तालासरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सुधीर ओझरे आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे तलासरीत शिवसेनेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र चांगलाच दणका बसला आहे.
पक्ष प्रवेशावेळी लाडक्या खरपडे, माजी सभापती, अनिल कुऱ्हाडे तालुका सरचिटणीस, जयेश वळवी उपसरपंच, रंचित कोम तालुका सचिव, अमित अडगर उपाध्यक्ष, सुबोध ओझरे युवा अधिकारी, नंदू गुरोडा, गणपत वागलोडा, चंद्रकांत बीज यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पालघर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, तलासरी तालुका संघटक विजय माळी उपस्थित होते.
सुधीर ओझरे हे माकपचे माजी आमदार राजाराम ओझरे यांचे सुपुत्र असून त्यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी तिकीट नाकारल्याने तसेच राष्ट्रवादीमधील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी ही या प्रवेशाची एक किनार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच शिवसेनेने राष्ट्रवादीला दिलेला हा धक्का येणाऱ्या काळात शिवसेनेला हात देतो की राष्ट्रवादीला हे येणाऱ्या काळात दिसून येणार आहे.