2025 पर्यंत कमी ‘खा’

किंम जोंग उनचा तुघलकी फर्मान : उत्तर कोरियामध्ये अन्नसंकट
प्योंगयांग - पोटभर अन्नासाठी व्याकुळ झालेल्या उत्तर कोरियाच्या जनतेला हुकुमशहा किम जोंग उन यांनी 2025 पर्यंत कमी खाण्याचा आदेश दिला आहे. किम जोंग उन स्वतःच्या या तुघलकी आदेशाद्वारे उत्तर कोरियातील अन्नसंकटाची तीव्रता कमी करू पाहत आहेत. उत्तर कोरियात पुरवठय़ातील मोठय़ा टंचाईमुळे अन्नधान्याच्या किमती खूपच वाढल्या आहेत. उत्तर कोरियाच्या लोकांच्या मागण्याच पूर्ण होत नसल्याची स्थिती आहे.
किम यांनी अन्न संकटासाठी अनेक घटकांना जबाबदार ठरविले आहे. लोकांसमोरील अन्नसंकट अत्यंत चिंताजनक ठरले आहे, कारण कृषी क्षेत्र अन्नधान्याच्या उत्पादनाच्या योजनेत अपयशी ठरले आहे. उत्तर कोरियावर अनेक प्रकारचे आंतरराष्ट्रीय निर्बंध लादले गेल्याने अन्नसंकट अधिक गंभीर झाले आहे. याचबरोबर कोरोना विषाणू आणि सागरी वादळ देखील या संकटासाठी जबाबदार असल्याचे किम यांनी म्हटले आहे.
2025 पर्यंत राहणार संकट
हुकुमशहाने अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीनंतर संकटग्रस्त क्षेत्रांमध्ये सैन्य तैनात केले आहे. अन्नाचे हे संकट 2025 पर्यंत राहू शकते असे किम यांनी म्हटले आहे. या संकटादरम्यान सत्तारुढ वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने देशाच्या हमग्योंग भागात एक बैठक घेत या भयावह स्थितीवर चर्चा केली आहे. तत्पूर्वी किम यांनी देशात अन्नाचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते असा इशारा देशवासीयांना दिला होता.
कृषी उत्पादन वाढविण्याच्या पद्धती शोधण्याचा निर्देश किम यांनी अधिकाऱयांना दिला आहे. अन्नसंकट आता लोकांमध्ये तणाव निर्माण करत आहे. उत्तर कोरियातील अन्न संकटादरम्यान प्रशासनाने आता सैन्याच्या आपत्कालीन भांडारातून सर्वसामान्य नागरिकांना तांदळाचा पुरवठा केला आहे. पुढील पिक हाती लागेपर्यंत संकट अधिक तीव्र होण्याची भीती निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.