आरोपींना वाचवणारे पोलिस आयुक्त हे पुण्याला लागलेला कलंक

आरोपींना वाचवणारे पोलिस आयुक्त हे पुण्याला लागलेला कलंक

     पुणे , (प्रबोधन न्यूज )  -   श्रीमंताच्या माजुरड्या-दारूड्या मुलामुळे दोन निष्पाप तरुण रस्त्यावर तडफडून मेले आणि पुण्याचे पोलिस आयुक्त त्याला वाचवत आहेत. त्याचा खोटा मेडिकल रिपोर्ट देत आहेत, असे आयुक्त पुण्याला लाभले आहेत, हे पुण्याला लागलेला कलंक आहेत, या आयुक्ताला बडतर्फ केले पाहिजे, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. पुणे पोलिसांनी ‘दो आँखे बारह हाथ’ असा सिनेमा सुरू केला असून, हा सर्व पैशांचा खेळ आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

१९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर येथे दारूच्या नशेत पॉर्श कार चालवून दोघांना चिरडणा-या अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याला अवघ्या १४ तासांत जामीन मिळाला. या प्रकरणी समाजमाध्यमांमधून टीका होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी आरोपीला पोलिस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला, त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले नाहीत, यासोबतच या आरोपीला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुणेकर करत आहेत, तसेच या प्रकरणामध्ये आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचा संशय पुणेकरांना आहे, यावरून खासदार राऊत यांनी पोलिस आयुक्त आणि आमदार टिंगरेंवर हल्लाबोल केला. दरम्यान, अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांनी संभाजीनगर येथून अटक केली आहे.

आरोपीवर ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा-आमदार धंगेकर

दरम्यान, पुण्यातील पब संस्कृती बंद करण्यासाठी कल्याणीनगर परिसरातील लोकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या आहेत. तर पहाटे दीड वाजेपर्यंत पब सुरू न ठेवण्याची विनंती आम्ही प्रशासनाला केली होती, असे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले. या प्रकरणातील अल्पवयीन मुलावर आयपीसी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. या प्रकरणामध्ये येरवडा पोलिस ठाण्यात काल कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्यामुळे त्या दिवशी पोलिसांना कोणाकोणाचे फोन आले याची कसून चौकशी केली पाहिजे अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे.