रशियाच्या धर्तीवर दरवळतेय भारतीय संस्कृती, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मुली देताहेत भरतनाट्यमचे धडे

रशियाच्या धर्तीवर दरवळतेय भारतीय संस्कृती, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेल्या पिंपरी चिंचवड शहरातील मुली देताहेत भरतनाट्यमचे धडे

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   गर्दीने गच्च भरलेला हॉल रंगमंचावर भरतनाट्यमची मनमोहक प्रस्तुती... एक एका मुद्रेला टाळ्यांचा कडकडाट... नृत्य संपताच प्रेक्षकांच्या गर्दीतून लहान मुले-मुली धावत येऊन कलाकारंना बिलगली आणि मंचावरच घेऊ लागली भरतनाट्यमचे धडे... हे दृश्य भारतातील नसून रशियातील पर्म शहरातील आहे.

रशियातील पर्म शहराच्या स्थानिक स्वायत्त संस्थेने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तेथे वैद्यकीय
शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय मुलींना आपली कला सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय नृत्यकला पाहण्यासाठी अनेक पालक आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते. पिंपरी-चिंचवड शहरातील वैष्णवी महेश सस्ते ही विद्यार्थीनी तिथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. वैष्णवी आणि तिच्यासोबत शिकणारी श्रीजेनी, कतिका महापात्रा व रशियन शिक्षिका स्वेतलाना या तिघींनी भरतनाट्यम सादर केले. तेथील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांनी त्यांची मुलाखत घेत भरतनाट्यमविषयी जाणून घेतले.

रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारी पिंपरी-चिंचवड सांगवीची विद्यार्थिनी वैष्णवीने दैनिक प्रभात शी बोलताना सांगितले की, रशियन नागरिकांना भारतीय संस्कृती, दागिन्यांचे कमालीचे आकर्षण आहे. येथील शिक्षिका देखील आमच्या कडून भरतनाट्यम शिकतात. या कार्यक्रमात तेथील लहान मुलींनी आमच्याकडून काही स्टेप्स शिकल्या व तातडीने सादरही केल्या. भरतनाट्यमसाठी आम्ही परिधान केलेले आभूषण देखील त्यांना आवडले आणि त्यांनी आमच्याकडून मागून घेतले. येथे शिक्षण घेत असताना ज्यांना माहीत होत की आम्हाला भारतीय शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन येते ते आमच्याकडे शिकण्यासाठी आग्रह धरतात. रशियन नागरिकांना भारतीय संस्कृतीविषयी खूपच आपुलकी असून जास्तीत जास्त जाणून घेण्याविषयी ते नेहमीच उत्सुक असतात.