'एमआयटी एडीटी'मध्ये इको-फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा विद्यार्थ्यींनी केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प

'एमआयटी एडीटी'मध्ये इको-फ्रेंडली गणपती बनविण्याची कार्यशाळा विद्यार्थ्यींनी केला पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प


पुणे, (प्रबोधन न्यूज )   - शाश्वत पर्यावरण पुरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ फाईन आर्ट्स आणि अप्लाइड आर्ट्सच्या(सोफा) वतीने एक दिवसीय पर्यावरणपूरक मातीच्या (इको-फ्रेंडली) गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या माध्यमातून लोकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचा तसेच सणांदरम्यान पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी दिलेला उत्फुर्त प्रतिसाद उल्लेखनिय होता. कार्यशाळेत तज्ज्ञ मुर्तीकार वासुदेव खरात यांनी नैसर्गिक साहित्य वापरण्याच्या महत्त्वावर भर देताना विद्यार्थ्यांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी इको-फ्रेंडली मुर्ती बनविण्याची पद्धतही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक यांद्वारे समजावून सांगितली. या कार्यशाळेत सादरीकरणाद्वारे प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींचे जलस्रोत आणि जलचरांवर होणारे हानिकारक परिणाम देखील अधोरेखित करण्यात आले. 


कार्यशाळेचा समारोप सहभागी विद्यार्थ्यांच्याकडून बनविण्यात आलेल्या इको-फ्रेंडली गणेश मूर्तींचे सुंदर प्रदर्शन करून करण्यात आला. तसेच त्यासाठी, विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्याध्यक्षा सौ.ज्योती ढाकणे, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बोलताना स्कुल ऑफ फाईन आर्टचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. मिलिंद ढोबळे म्हणाले, "या कार्यशाळेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे समाधान वाटते. पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी आमचे विद्यार्थी एकत्र येत आहेत हे पाहून आनंद होत आहे. मातीच्या मूर्तींच्या वापरास प्रोत्साहन देऊन, आमचे विद्यार्थी आगामी काळात सण उत्सव पर्यावरणापूरक साजरे करण्यासाठी समाजाला नक्कीच प्रेरणा देतील."


या कार्यशाळेसाठी विभाग प्रमुख प्रा. महेंद्र पोतदार, प्रा. स्मिता देशपांडे, प्रा.प्रसाद निकुंभ, प्रा.अंजली भांबरे, प्रा.शिलकुमार कुंभार, प्रा.प्रसाद पवार आणि प्रा.उत्तम जानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.