समीर वानखेडे यांच्या धर्मांतरणाचे पुरावे नाहीत

समीर वानखेडे यांच्या धर्मांतरणाचे पुरावे नाहीत

मुंबई -

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतरण केलेले नाही असे सकृतदर्शनी लक्षात येते, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.

हलदर यांनी शनिवारी समीर वानखेडे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे आणि एक निवेदनही हलदर यांना दिले. त्यानंतर हलदर यांनी माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी धर्मांतर केले नसल्याचे स्पष्ट केले.

काही लोक कुटुंबावर जातीवरून हल्ला करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही अनुसूचित जातीचे आहात काय, असे मी वानखेडेंना विचारले तेव्हा त्यांनी हो म्हणून सांगितले. ते महार जातीचे असल्याचे मला समजले. त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेले नाही. जातीशीसंबंधित काही पुरावेही वानखेडेंनी सादर केले, असे हलदर म्हणाले.

वानखेडे हे शिक्षित आहेत. ते कायदा जाणतात. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, असे सांगतानाच आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. पण, कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करेल ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपले काम करेल, असेही हलदर यांनी स्पष्ट केले.