व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग यांचे निधन

पुणे -
आपल्या व्हायोलिन वादनानं श्रोत्यांना निखळ आनंद देणाऱ्या प्रभाकर जोग यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी पुण्यातील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गाणारं व्हायोलिन या कार्यक्रमातून त्यांनी प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मराठी, हिंदी क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रेटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जोग यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या राहत्या घरी चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. मराठी आणि हिंदी क्षेत्रातील मोठमोठ्या संगीतकारांशी त्यांचा संवाद होता. त्यांच्याशी ऋणानुबंध होते. ते त्यांनी अखेरपर्यत जपले. त्यांच्या व्हायोलिन वादनानं केवळ भारतातीलच नाही जर जगभरात असलेले मराठी संगीतप्रेमी जोडले गेले होते.
त्यांच्या संगीत साधनेविषयी सांगायचं झाल्यास त्यांनी सुरुवातीला गजानन राव जोशी आणि नारायणराव मारुलीकर यांच्याकडून गायन आणि संगीताचे धडे गिरवले. जोगकाका म्हणून लोकप्रिय झालेल्या प्रभाकर जोग यांना त्यांच्या बंधुंकडून देखील व्हायोलिन वादनाचे मार्गदर्शन मिळाले.