बोगस कागदपत्राद्वारे महापालिकेची फसवणूक - योगेश बहल यांचा आरोप

बोगस कागदपत्राद्वारे महापालिकेची फसवणूक - योगेश बहल यांचा आरोप


सत्ताधाऱ्यांच्या आशिर्वादाने निविदा प्रक्रियेत कोट्यवधींची भ्रष्टाचार - योगेश बहल 

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने राबविलेल्या मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरवठ्याच्या निविदेमध्ये श्रीकृपा सर्विसेस या कंपनीने महापालिकेला बोगस कागदपत्रांद्वारे अनुभवाचा दाखला जोडून फसवणूक केली आहे. या फसवणुकीमध्ये सत्ताधारी पक्षातील काही लोकांचा समावेश असून अधिकाऱ्यांनीही बोगस कागदपत्रांची शहानिशा न करता केवळ महापालिकेची लूट करण्याच्या हेतूने हा संपूर्ण प्रकार केला असून बोगस कागदपत्रांद्वारे निविदा मिळविणाऱ्या ठेकेदारासह त्यांना अनुभवाचे खोटे दाखले देणाऱ्या संस्थांवर तसेच या बोगसगीरीमध्ये सहभागी असलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल यांनी केली आहे. 

महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची माहिती देण्यासाठी गुरुवारी (दि. 21) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर व ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना बहल म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणेबाबत निविदा (क्र. 10/2021-22) प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये एकुण चार कंत्राटदार सहभागी झाले होते. त्यामध्ये तांत्रिक मुल्यमापनाचे गुण आणि निविदेतील दर समान आल्यामुळे बीव्हिजी इंडिया लिमिटेड, रुबी अलकेअर सर्व्हिसेस प्रा.लि. आणि श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा.लि. या तीन ठेकेदारांना काम विभागून देण्यात आले आहे. तर प्रिन्सिपल सिक्‍युरिटी ऍण्ड अलाईड सर्व्हिसेस प्रा.लि. यांना तांत्रिक मुल्यमापनामध्ये गुण कमी आल्याने पात्र ठरल्यानंतरही काम देण्यात आलेले नाही. केवळ सत्ताधाऱ्यांच्या व बोगस कागदपत्राद्वारे निविदेत सहभागी झालेल्या ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचविण्यासाठी प्रशासनाने बेकायदा प्रकार केला आहे. 

श्रीकृपा सर्व्हिसेस या कंपनीला निविदा प्रक्रियेत सादर केलेल्या अनुभवाच्या अटीचा कोणताही अनुभव नसताना त्यांना बोगस कागदपत्रांच्या आधारावर पात्र ठरविण्यात आले आहे. हा सर्व प्रकार महापालिकेतील सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांनी संगणमताने केलेला आहे. श्रीकृपा सर्व्हिसेस या कंपनीने अनुभवासाठी साई मेडिक्‍यूअर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचे वरळी येथील साई हॉस्पीटल, 3 एएम मेडिकोरम प्रा. लि. यांचे कोंढवा येथील लाईफ लाईन हॉस्पीटल, आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पीटल, चेंबुर येथील ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीला मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविल्याचा अनुभवाचा दाखला निविदा प्रक्रियेसोबत जोडला आहे. 

मात्र, मी माहिती अधिकारात घेतलेल्या कागपत्रांची पडताळणी केली असता वरील चारही हॉस्पीटलला श्रीकृपा सर्व्हिसेस यांनी कोणतेही कर्मचारी पुरविले नसल्याचे समोर आले आहे. केवळ लेटरहेडवर मनुष्यबळाचा हा बोगस अनुभव दाखविण्यात आला आहे. याबाबत कामगार कल्याण, जीएसटी, पीएफ, टीडीएस व इन्कमटॅक्‍स विभागाच्या कागदपत्रांमध्ये त्याचा कोठेही उल्लेख दिसून येत नाही. साई हॉस्पीटलने 19 कोटींचा दाखला दिला आहे. तर तीन वर्षांमध्ये याच हॉस्पीटलने इन्कमटॅक्‍स रिटर्नमध्ये आपला एकूण तीन वर्षांचा खर्च सुमारे चौदा कोटी इतका दाखविला आहे. त्यामध्ये श्रीकृपा सर्व्हिसेस या कंपनीला एकही रुपया अदा केल्याचे दाखविलेले नाही. 

"3 ए. एम. मेडिक्‍युरम प्रा. लि.' यांच्या लाईफलाईन हॉस्पीटलला श्रीकृपा सर्व्हिसेस यांनी एकुण 6 कोटी 10 लाख 25 हजार 400 रुपये अदा केल्याचे दाखविण्यात आले आहे. वस्तुत: '3 ए.एम. मेडिक्‍यूरम प्रा. लि.' यांचे कोठेही हॉस्पीटलच अस्तित्वात नाही. तसेच आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पीटल व चेंबुर येथील ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीच्या रुग्णालयाला जे मनुष्यबळ पुरविले आहे ते देखील खोटे असून श्रीकृपाने चारही दाखले खोटे सादर करून महापालिकेची फसवणूक केली आहे. केवळ सत्ताधाऱ्यांची मर्जी राखण्याकरीता त्यांच्या नात्या गोत्यातील, आवडीच्या ठेकेदारांना काम देण्याकरीता प्रशासनाने मिळून केलेला हा अत्यंत गंभीर असल्याचे बहल यावेळी म्हणाले. 

या प्रकाराबाबत प्रतिक्रीया घेण्यासाठी महापालिकेची सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्णम गोफणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेण्याचे टाळले. तर ओम चैतन्य हॉस्पीटलच्या संचालकांशी संपर्क साधला असता त्यांचे फोन बंद होते. 

बोगसगिरीचा उच्चांक 
"श्रीकृपा सर्व्हिसेस' या कंपनीचा कोणताही करार झालेला नसून अनुभवाचे सर्व दाखले खोटे आणि बोगस आहेत. श्रीकृपा सर्व्हिसेसने दाखविलेल्या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या इन्कमटॅक्‍स रिटर्नमध्ये त्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पीएफ, इएसआयसी, टीडीएस, जीएसटी व कामगार कल्याण विभागाकडे याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध करून वरील करारनामे व व्यवहारापोटी शासकीय कार्यालयांमध्ये कोणतीही माहिती आढळून येत नाही. तसेच जे अनुभवाचे दाखले जोडण्यात आलेले आहेत ते एकाच संगणकावर बनविण्यात आल्याचे दिसून येत असून एकाच प्रिंटरवरून त्याची प्रिंट काढल्याचेही कागदपत्रांवरूनच स्पष्ट होत आहे, त्यामुळे हा आजपर्यंत महापालिकेतील बोगसगिरी करून केलेल्या भ्रष्टाचाराचा उच्चांक ठरल्याचेही बहल म्हणाले. 

आयुक्तांनी स्वत: तपासणी करावी 
आम्ही सादर केलेल्या पुराव्यावरून तसेच महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची छानणी करून पुढील आठ दिवसांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करून दोषींवर कारवाई करावी. श्रीकृपा सर्व्हिसेसच्या माध्यमातून महापालिकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने ज्या चार संस्थांनी बोगस अनुभवाचे व व्यवहाराचे जे खोटे दाखले दिले त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच श्रीकृपा सर्व्हिसेसने वरील चार संस्थांना जे मनुष्यबळ पुरविले त्यांच्या नावाची, पत्ता व फोन क्रमांकासह यादी, शैक्षणिक प्रमाणपत्र, वेतन अदा केल्याचे दाखले, बॅंक स्टेटमेंट, डॉक्‍टरांचे जीएसटी भरलेचे दाखले, आया, वॉर्डबॉय यांचे पीएफ, इएसआयसी भरलेले दाखले मागविल्यास खरी माहिती समोर येईल, असेही बहल यावेळी म्हणाले.