मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची दुचाकीही पळवली

मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या व्यक्तीची दुचाकीही पळवली

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  मोबाईल चोरीची तक्रार देण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या व्यक्तीची दुचाकी देखील पळवून नेली. हा प्रकार 20 जुलै रोजी सायंकाळी सहा ते सात वाजताच्या काळामध्ये पीएमटी चौक भोसरी आणि साई सागर हॉटेल भोसरी येथे घडला.

सोमनाथ प्रकाश वाघ (वय 29, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमटी चौक भोसरी येथे एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडे घरी फोन करण्यासाठी फोन मागितला. फिर्यादी यांनी विश्वासाने अनोळखी व्यक्तीला फोन दिला. मात्र तो अनोळखी व्यक्ती गर्दीचा फायदा घेत मोबाईल घेऊन पळून गेला. तसेच फिर्यादी यांच्या मोबाईल मधून तीन हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले.

या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. ते पुणे नाशिक महामार्गावरील साई सागर हॉटेल, भोसरी येथे आले असता त्यांनी दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला भोसरी पोलीस ठाण्याचा पत्ता विचारला. त्यावर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने 'भोसरी पोलीस स्टेशन जवळच आहे. तेथे माझी खूप ओळख आहे. मी तेथील पोलिसांना सांगून तुला मदत करायला सांगतो' असे म्हणत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांना पान टपरीवरून सिगारेट घेऊन येण्यास पाठवून त्या दुसऱ्या अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांची दुचाकी घेऊन पळ काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.