कार अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कार अपघात; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

सांगली -

पायी चालत जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांना सांगलीत खासगी चारचाकी वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा अपघात टायर फुटल्याने घडला असून यात तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे, नागप्पा सोमांना आचनाळ आणि म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल अशी मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, हुलजंती तालुका मंगळवेढा येथे दीपावलीच्या निमित्ताने महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. या यात्रेसाठी कर्नाटकातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.

या यात्रेसाठी कर्नाटकातील रायचूर येथून भाविक पायी चालत निघाले होते. पंढरपूर ते विजयपूर मार्गावरील उमदीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेवाळे वस्ती जवळ त्यांना अपघात झाला. पुण्याहून येत असलेल्या कारचा अचानक टायर फुटून भीषण अपघात झाला.
यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ भेट देऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसांकडून करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.