मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं तर गावागावात गोध्रा होईल – प्रकाश आंबेडकर

रेल्वेचा डबा बाहेरून पेटत नाही, कितीही प्रयत्न केला तरी पेटत नाही. याचा अर्थ आत बसलेल्यांनी डबा पेटवला असावा असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं तर गावागावात गोध्रा होईल – प्रकाश आंबेडकर

बुलढाणा - बुलढाण्याच्या एका सभेत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी मुस्लीम समाजाला भाजपाला मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे. “मला १०० टक्के माहिती आहे की मुसलमान कमळाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही. कारण त्यांना माहिती आहे की मी आत्ता मतदान केलं, तर गावागावात गोध्रा झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसलेली आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“गोध्रा दंगलीबाबत मी भाजपावाल्यांना आव्हान दिलं होतं की माझ्याबरोबर बसा. खुलेआम. याचं कारण त्या रेल्वेचा डबा जाळायचा मीही प्रयत्न केला. नाही असं नाही. पण तो बाहेरून जळत नाही. तुम्हीही प्रयत्न करा. पेट्रोल टाका, डिझेल टाका, काहीही टाका. तो बाहेरून पेटत नाही. तसाच्या तसा राहातो. काय पेंट केलाय कुणाला माहिती. तो पेटतच नाही. त्याला आतूनच पेटवावा लागतो”, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

“आतून पेटवला म्हणजे जो कुणी आत बसला आहे त्यानंच पेटवला असेल. दुसरं कोण पेटवणार आहे? म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की इथे फसवेगिरीचं फार मोठं षडयंत्र झालं आहे”, असा गंभीर आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

'गोध्रा हत्याकांड' हे नेमकं काय प्रकरण आहे?

२७ फेब्रुवारी २००२ ची सकाळ होती. अशी सकाळ की जी गुजरातच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरली. तसेच ही सकाळ गेल्या दशकात झालेल्या सर्वाधिक मोठ्या दंगलीचे कारण आणि केंद्रबिंदू ठरली. या सकाळी जे काही घडलं ते कोर्टाच्या रेकॉर्डपासून वर्तमानपत्राच्या हेडलाइपर्यंत आणि सामान्य माणसांसाठी गोध्रा हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. या हत्याकांडात ५९ जण ठार झाले होते. मात्र, त्यानंतर उसळलेल्या दंगलीनंतर सुमारे १२०० जण ठार झालेत.

२७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेस गोध्राच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुमारे पाच तास उशिराने पोहचली होती. गाडीची नियोजित वेळ ही रात्री २ वाजून ५५ मिनिटांची होती. मात्र ही गाडी सकाळी सात वाजून ४३ मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोहचली आणि पाच मिनिटे थांबली होती.

अहमदाबादकडे जाणार्‍या साबरमती एक्स्प्रेसमध्ये त्या दिवशी मोठ्या संख्येने कारसेवक होते. अयोध्येत झालेल्या एका यज्ञ समारंभातून ते परतत होते. गाडी जेव्हा गोध्रा रेल्वे स्टेशनवर थांबली तेव्हा काही कारसेवकांचे स्टेशनवरील काही मुस्लिम विक्रेत्यांशी भांडण झाले. गाडी सुरू झाल्यावर भांडण थांबले, मात्र काही वेळातच आठ वाजेच्या सुमारास स्टेशन सोडल्यावर ए केबिनजवळ गाडी पुन्हा थांबली. गाडी सुरू झाल्यावर दोन वेळा चेन खेचण्यात आली. एकदा ७.५५ वाजता आणि दुसर्‍यांदा ७.५८ वाजता ही गाडी थांबविण्यात आली.

गोध्रा हत्याकांडाचे ग्राउंड झिरो हे ए केबिन हे सांगता येईल. या ठिकाणीच २७ फेब्रवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्याला आग लावण्यात आली. या डब्यासमोर जमा झालेल्या जमावाने आग लावल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात गुजरात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर असे सांगण्यात आले की, गोध्रा रेल्वे स्टेशनवरील मुस्लिम विक्रेते आणि कारसेवकांमध्ये झालेल्या भांडणामुळे ही आग लावण्यात आली होती. तर गुजरात सीआयडी आणि एटीएसने आपल्या अहवालात आग लावण्याची घटना ही पूर्व नियोजित कट असल्याचे नमूद केले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या रेल्वे गाडीला लक्ष्य बनवून आग लावण्याचा हा पहिला प्रकार होता. यानंतर यावर राजकारण सुरू झाले. दुसरीकडे या संदर्भात पोलिसांसमोर या घटनेच्या दोषींना पकडण्याचे आव्हान होते. गोध्रा रेल्वे पोलिसचे तत्कालिन पोलिस अधीक्षकांमार्फत या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली. परंतु दोन महिन्यानंतर या घटनेच्या चौकशीची जबाबदारी गुजरात सीआयडीच्या तत्कालिन महासंचालक राकेश अस्थाना यांच्याकडे सोपविण्यात आली. अस्थाना हे नुकतेच गुजरातमध्ये दाखल झाले होते. त्यांनी यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेल्या चारा घोटाळा, कोलतार घोटाळा आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणांच चौकशी केली होती. अस्थाना यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.

साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्यात लागलेली आग ही क्षणिक प्रतिक्रिया नसून हे जाणू-बुजून घडवून आणलेला हत्याकांड होता. या संदर्भात एसआयटीने जाबिर बिन यामिन बेहरा या स्थानिक चहा विक्रेत्याची सविस्तर चौकशी केली, तेव्हा त्याने हा कट असल्याचे कबूल केले.

बेहरा याने मॅजिस्ट्रेटसमोर पाच फेब्रुवारी २००३ नोंदविलेल्या जबाबानुसार कारसेवकांनी भरलेल्या एस-६ या डब्याला आग लावण्याचा कट गोध्रा रेल्वे स्टेशनच्या जवळच्या सिंगल फडिया या परिसरात राहणाऱ्या मौलाना हुसेन उमरजी याने रचला होता. या कामासाठी मौलाना याने आपल्या चार शिष्यांना सामिल केले होते. बिलाल हाजी, फारुक भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला असे यांची नावे आहेत. यातील रज्जाक कुरकुर याच्या मालकीच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६ फेब्रुवारी २००२च्या रात्री चाळीस लिटर पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहय्याने एस-६ हा डबा जाळ्यात आला. एसआयटीच्या चौकशीनुसार, एस-६ या डब्याला जाळण्यासाठी जे पेट्रोल वापरण्यात आले ते काळाभाई पेट्रोल पंपावरून आणण्यात आले होते. हा पेट्रोलपंप गोध्रापासून जवळच आहे. या पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल खरेदी करण्यात आले. या संदर्भातील साक्ष पेट्रोल पंपाच्या दोन कर्मचार्‍यांनी एसआयटीकडे दिली आहे.

साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्ब्यात कारसेवक मोठ्या प्रमाणात होते, ही माहिती मौलानाला पूर्वीच पुरवण्यात आली होती. हल्लेखोरांना हा हल्ला मुळात रात्री करायचा होता. तशी योजनाही बनविण्यात आली होती. साबरमती एक्स्प्रेस ही साधारण रात्री २.५५ वाजता ग्रोधा स्टेशनमध्ये येत आणि त्याच दरम्यान हा हल्ला करायचा होता. परंतु गाडीला उशीर झाल्याने रात्रीच्या अंधारात होणारा हा प्रकार दिवसाढवळ्या करणे हल्लेखोरांना भाग पडले.

या दंगल प्रकरणातून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांची अद्याप सुटका झालेली नाही. दंगलींदरम्यान मोदी सरकारनं जाणीवपूर्वक निष्क्रियता दाखवली असा आरोप आहे.

या संदर्भात काँग्रेस नेता व कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी बीजेपी चे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना नपुसंक म्हटले आहे. ते याचे समर्थन करतांना म्हणतात, मी मोदींचा डॉक्टर नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक तपासणी मी केलेली नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक स्थिती काय आहे, याबाबत मी बोललेलो नाही. तर 'नपुंसक' हा शब्द 'क्षमता' या अर्थाने राजकीय संदर्भात वापरला आहे. एखादी परिस्थिती हाताळण्यात असलेली अकार्यक्षमता, म्हणून हा शब्द वापरला असून तो योग्यच आहे,' असे आपल्या भूमिकेचे समर्थन खुर्शिद यांनी केले. लोकांची हत्या करणा-यांना तुम्ही थांबवू शकला नाहीत, त्यामुळे तुम्ही नपुंसक आहात, असा आमचा आरोप आहे असे खुर्शीद मंगळवारी म्हणाले होते.