गोव्यात भाजप पुन्हा सत्तेवर येणार

गोव्यात भाजप पुन्हा सत्तेवर येणार

पणजी, दि. 10 मार्च – भारतीय जनता पक्ष गोव्यात सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. गोव्यात भाजपला १९ जागांवर विजय मिळाला आहे. पण बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला २१ जागांची गरज. गोव्यात भाजप पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळत आहेत. तीन अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देणार असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे.

गोव्यात भाजप पक्ष १९ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी ३ जागांची गरज आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या दाव्यानुसार तीन अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळं भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.


डिचोलीचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी भाजपला पाठिंबा दिला असल्याची चर्चा आहे. अपक्ष आमदारांचा पाठिंबा जाहीर होताच गोव्यात भाजपच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज गुरुवारीच भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. दरम्यान, गोव्यातील राजकीय घडामोडींवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेवून आहेत. देवेंद्र फडणवीस हे निवडणुक काळात भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. गोव्यातील यशामध्ये त्यांचाही हात आहे. अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु आहेत.

गोव्यात शिवसेनेला धक्का

महाराष्ट्रात भाजप - शिवसेनेत संघर्ष असतानाच शिवसेना भाजपला शह देण्यासाठी गोवा व उत्तर प्रदेश निवडणुकीच्या रिंगणात उतरली मात्र, दोन्ही राज्यात शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेची दाणादाण उडाली असून गोव्यातही पक्षाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. गोव्यात शिवसेनेनं १२ जागांवर उमेदवार उभे केले होते. शिवाय  राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी देखील केली होती. मात्र, दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत.