युद्धाच्या विरोधात रशियाला घरातूनच तीव्र विरोध; नागरिकांना हवी शांतता

युद्धाच्या विरोधात रशियाला घरातूनच तीव्र विरोध; नागरिकांना हवी शांतता

मॉस्को, दि. 25 - रशिया-युक्रेन युद्धाचा तीढा कायम आहे. मात्र, ‘युद्ध नको, शांतता हवी’ यासाठी रशियात जागोजागी मोर्चे निघाले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यावर रशियातील सेंट पीटर्सबर्ग, मास्कोमध्ये युद्धाच्या विरोधात हजारो रशियन नागरिक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करीत आहेत.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग, मॉस्कोमध्ये युद्धाच्या विरोधात अनेक नागरिक निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र, रशियातील ५३ शहरांतील तब्बल १ हजार ७९२ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ९४० आंदोलनकर्त्यांना मॉस्कोमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १९७९मध्ये अफगाणिस्तानवर सोव्हिएत रशियाने केलेल्या आक्रमणानंतर मॉस्कोत युद्धाविरोधात सर्वात मोठा मोर्चा निघाला आहे.

दरम्यान, युक्रेनने रशियाला चर्चेचे आमंत्रण दिले आहे. मात्र, युक्रेनने माघार घेतल्यास चर्चेसाठी तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी स्पष्ट केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह म्हणाले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे खोटं बोलत असून त्यांनी रशियासमोर कोणताही चर्चेचा प्रस्ताव ठेवला नाही. सध्याच्या युक्रेन सरकारला रशियाकडून लोकशाही सरकारचा दर्जा मिळण्याची कोणतीही शक्यता नाही.

रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ला केला असून नाटो देशांनी आमची साथ सोडल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. तसेच या युद्धात युक्रेनला एकट पाडल्याचेही झेलेन्स्की यांनी सांगितले आहे. भीतीपोटी युक्रेनला नाटोत सहभागी केले नसल्याचा आरोपही झेलेन्स्स्की यांनी केला आहे.