मावळात शिवीगाळ केल्यावरून नातलग तरुणाचा गोळ्या झाडून खून

मावळात शिवीगाळ केल्यावरून नातलग तरुणाचा गोळ्या झाडून खून
पुणे -
पुण्यात मावळमध्ये वीस वर्षीय तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. रोहन चंद्रकांत येवले (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून अविनाश शिवाजी भोईर (२५) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. दोघे ही नातेवाईक असून आढले खुर्द या गावात राहतात. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच रोहनचा खून केल्याचा संशय पिंपरी-चिंचवड पोलिसांना व्यक्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीस वर्षीय रोहन आणि अविनाश हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद होऊन प्रकरण शिवीगाळ करण्यापर्यंत गेलं होतं. याच रागातून आरोपी अविनाशने रोहनला घराबाहेर बोलावले. त्यांच्यात शुक्रवारी पुन्हा झटापट झाली. शिवीगाळ केल्याच्या रागातून सोबत आणलेल्या पिस्तूलातून अविनाशने रोहनच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी रोहनच्या छातीच्या वर तर दुसरी गोळी दंडाला स्पर्श करून गेली. यानंतर घटनास्थळावरून अविनाशने पळ काढला, अशी माहिती शिरगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिली आहे.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहनला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान रोहनचा मृत्यू झाला आहे. आरोपी अविनाश देखील जखमी झाला असून त्याच्यावर इतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार होताच आरोपी अविनाशला ताब्यात घेणार आहोत असे पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले आहे.