विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके न देताच ठेकेदारांवर पिंपरी-चिंचवड महापालिका मेहरबान
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप वह्या-पुस्तके वाटप करण्यात आलेले नाहीत.

कोट्यवधींची बिले अदा; माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या प्रमुखांचे निलंबन करा
मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अद्याप वह्या-पुस्तके वाटप करण्यात आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप न करताच मुख्याध्यापकांना माध्यमिक विभाग प्रमुखांनी जबरदस्तीने चलन घेण्यात आले आहेत. तत्पुर्वीच ठेकेदारांला बिले अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य मोरेश्वर भोंडवे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले असून सखोल चौकशी करुन अहवाल शिक्षण समितीपुढे सादर करण्याची मागणी केली. सदरील पत्रात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 18 माध्यमिक शाळा आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळावे, म्हणून निविदा न राबविता थेट पध्दतीने वह्या व पुस्तकांची खरेदी करण्यात आली. महापालिकेच्या माध्यमिक विभागाने सन 2020-2021 वर्षासाठी वह्या व स्वाध्यायमाला पुस्तके खरेदीचा पुरवठा आदेश संबंधित ठेकेदाराला दिला. त्याने 31 मार्च पुर्वी एका ही विद्यार्थ्यांना साहित्य दिलेले नाही.
मात्र, त्या ठेकेदाराने माध्यमिक शाळांना वह्या व पुस्तके दिल्याचे बनाव करुन मुख्याध्यापकांकडून जबरदस्तीने पुरवठा मालाचे डिलीव्हरी चलन घेतले आहे. शालेय साहित्य पुरवठा न करता त्या ठेकेदाराने महापालिकेच्या लेखा विभागातून 31 मार्च पुर्वी बिल अदा करण्यात आले आहे.
याशिवाय महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये देखील वह्या व पुस्तके जमा केल्याचा खोटा बनाव करण्यात आला आहे.प्रत्यक्षात सदरील साहित्य महापालिकेकडे कोठेही जमा नसून तेथेही मनपाची फसवणूक केली आहे. ठेकेदाराने 50 टक्के रक्कम महापालिकेकडून घेतलेली आहे.
सदरील बाब गंभीर स्वरुपाची असून त्या ठेकेदाराने महापालिकेसह माध्यमिक विभागाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर फाैजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच त्याने घेतलेली रक्कम त्वरीत वसूल करण्यात यावी. संबंधिताची सखोल चाैकशी करुन ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
दरम्यान, प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये वह्या व पुस्तके विद्यार्थ्यांना मिळालेली नाहीत. तरीही ठेकेदाराने खोटी चलन जोडून बिले काढलेली आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची असताना त्याकडे माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या प्रमुखांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे या प्रकरणी शिक्षण विभागाच्या संबंधित अधिका-यांची निलंबन करुन चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी भोंडवे यांनी केलेली आहे.