भारतीय कोविशील्ड आणि कोवॅक्सीनला भारी पडणार रशियन 'स्पुतनिक व्ही' ? जाणून घ्या वैशिष्ट्ये !

भारतीय कोविशील्ड आणि कोवॅक्सीनला भारी पडणार रशियन 'स्पुतनिक व्ही' ? जाणून घ्या वैशिष्ट्ये !

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - सध्या संपूर्ण जग करोना विषाणूशी झुंज देत आहे. त्याच दरम्यान सर्वत्र कोविड लसीची मोहीम जोरात सुरू आहे. 1 मे रोजी, देशातील 18 वर्षावरील लोकांना लसीचा डोस दिला जाईल. सध्या आपल्याकडे कोविशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसी दिल्या जात आहेत.  रशियाची 'स्पुतनिक व्ही' ही लस 1 मे रोजी भारतात दिली जाईल अशा बातम्याही आल्या आहेत. रशियन लसीच्या संशोधन गटाचे प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी आपल्या मुलाखतीत एका वृत्तवाहिनीला ही माहिती दिली. कशी आहे ही लस? ती अधिक प्रभावी आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 

रशियाने आपल्या या लसीला 'स्पुतनिक व्ही' नाव दिली आहे. रशियन भाषेत 'स्पुतनिक' या शब्दाचा अर्थ उपग्रह आहे. रशियाने जगातील पहिले उपग्रह बनविले होते. त्याचे नाव 'स्पुतनिक' असेही ठेवले गेले. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिली कोविड लस जाहीर केली.

तसे पाहता १ मे रोजी भारतात येणाऱ्या 'स्पुतनिक व्ही' लसीची किती डोस पाठविल्या जातील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही काळात 5 कोटी लस भारतात पाठवल्या जातील. ही लस येथील डॉ. रेड्डी लॅबच्या माध्यमातून भारतात आयात केली जाईल. भारत सुरुवातीला स्पुतनिक व्ही आयात करेल, परंतु नंतर त्याचे उत्पादन देशातच होईल.
 
* कोविशिल्ड-कोवॅक्सीनपेक्षा 'स्पुतनिक-व्ही' अधिक प्रभावी ?
तज्ज्ञांच्या मते, रशियाची 'स्पुतनिक-व्ही' करोना लस भारताच्या कोविशिल्ड-कोवॅक्सीनपेक्षा अधिक प्रभावी आहे. रशियाच्या गमालेया संशोधन संस्थेचा असा दावा आहे की स्पुतनिक व्ही 91.6 टक्के प्रभावी आहे, तर कोविशिल्ड 80 टक्के प्रभावी आणि कोवॅक्सीन 81 टक्के प्रभावी आहेत. सध्या, अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या आणि सीरम संस्थेद्वारे निर्मित कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सीनद्वारे देशभर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. स्पुतनिक व्हीच्या आगमनाने देशात या दोन लसींची मागणी कमी होऊ शकते. सध्या दरमहा कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या  70 दशलक्ष कुप्या तयार केले जात आहेत.
 
* 'स्पुतनिक व्ही'  2-8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवू शकता
'स्पुतनिक व्ही' च्या उत्पादकांच्या म्हणण्यानुसार ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानातदेखील ठेवली जाऊ शकते. ही लसदेखील दोन डोसमध्ये दिली जाते. कोविशील्डच्या दोन डोसांमधील अंतर चार ते आठ आठवडे असते आणि ते साठवण्यासाठी शून्य तापमानची (शून्यापेक्षा कमी) आवश्यक नसते. कोवॅक्सीनचे दोन डोस 4-6 आठवड्यांच्या अंतराने दिले जातात. ते 2-8 डिग्री सेल्सियस तापमानात साठवले जाऊ शकते.

* जाणून घ्या, 'स्पुतनिक व्ही' लसीची किंमत
'स्पुतनिक व्ही' लसीची किंमत प्रति डोस सुमारे 750 रुपये ( $ 10 ) आहे. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रोव्ह म्हणाले की, लसची किंमत सर्व देशांसाठी समान असेल. भारतासह 60 देशांमध्ये रशियाच्या लसीला मान्यता देण्यात आली आहे. ही लस बऱ्याच देशांत पाठविण्यात आली आहे.