लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात!

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात २५८ उमेदवार रिंगणात!

मुंबई , (प्रबोधन न्यूज )  - लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात राज्यातील ११ मतदारसंघात निवडणूक होणार असून तेथील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. या ११ मतदारसंघात अंतिमत: २५८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. विशाल पाटील यांनी बंडाचे निशाण उतरवण्यास नकार देऊन आपला अर्ज कायम ठेवल्याने तेथे तिरंगी लढत होणार आहे. तर सोलापूरमध्ये वंचित आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तेथे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपूते यांच्यात सरळ लढत होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिस-या टप्प्यात ७ मे रोजी राज्यातील ११ मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या अकरा मतदारसंघात ३१७ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. ५९ उमेदवारांनी माघार घेतली असून २५८ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. रायगडमध्ये १३, बारामती ३८, धाराशीव (उस्मानाबाद) ३१, लातूर २८, सोलापूर २१, माढा ३२, सांगली २०, सातारा १६, रत्नागिरी-सिंधुदुर्ग ९, कोल्हापूर २३, व हातकणंगले मतदारसंघात २७ उमेदवार रिंगणात आहेत.

सांगली मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी केली असून, पक्षाच्या दबावानंतरही आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत होणार आहे. विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले आहे. वंचितच्या राहुल गायकवाड यांनी सोलापूरमधून माघार घेतली आहे. त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात सरळ लढत होणार आहे.