राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण घटले

राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण घटले

मुंबई , (प्रबोधन न्यूज )  -  राज्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे फैलावणा-या आजारांची रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसत आहे. या महिन्यामध्ये या आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच डासांमुळे फैलावणारे जन्य आजार कमी करण्यासाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न तसेच विविध महापालिकांच्या क्षेत्रांमध्ये करण्यात येत असलेले प्रयत्न यांनाही यश येत असल्याचे यातून दिसत आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मलेरियाच्या प्लास्मोडियम विविएक्स या प्रकाराच्या दोन हजार ६४९ रुग्णांची ऑगस्ट महिन्यात नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये ही संख्या दोन हजार नऊ, ऑक्टोबरमध्ये एक हजार ८१०, डिसेंबरमध्ये एक हजार ७६८, तर जानेवारी महिन्यात ४३७ रुग्णसंख्या नोंदण्यात आली. संमिश्र प्रकारच्या मलेरियाचे ऑगस्ट महिन्यात एक हजार २४१ रुग्ण आढळून आले होते, डिसेंबरमध्ये ही संख्या ७९५ होती, तर जानेवारीमध्ये १४७ रुग्णांची नोंद झाली.

डेंग्यू रुग्णांच्या संख्येमध्येही वेगाने घट झालेली दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात ही संख्या दोन हजार ७०१ होती. डिसेंबरमध्ये ती एक हजार ४९८ होती, तर यावर्षी जानेवारी महिन्यात ती ४२६पर्यंत खाली आली. चिकनगुनियाची रुग्णसंख्या ऑगस्ट महिन्यात कमी, म्हणजे १३४ इतकी होती. त्यात वाढ होऊन ती नोव्हेंबर महिन्यात ३६० वर गेली. तर यावर्षी जानेवारीमध्ये चिकनगुनियाच्या ७७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.