नवाब मलिकांचे वानखेडे कुटुंबीयांवर पुन्हा आरोप

नवाब मलिकांचे वानखेडे कुटुंबीयांवर पुन्हा आरोप

मुंबई -

आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप केले आहेत. समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय जन्माने मुस्लीमच आहेत. त्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली आहे, असा दावा आज पुन्हा मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

फिल्म इंडस्ट्रीमधील लोकांना अटक केल्यानंतर समीर वानखेडे माध्यमांसमोर आले. परंतु २०१५ पासून त्यांनी स्वतःची ओळख लपवली, असंही नवाब मलिकांनी म्हटलंय. समीर वानखेडे यांनी शनिवारी मुंबईत अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अरुण हलदर यांनी काल (शनिवारी) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समीर वानखेडे यांनी कोणताही धर्म परिवर्तन केलेला नाही, असे सांगितले होते. त्यानंतर नवाब मलिक यांनी आज (रविवारी) पुन्हा वानखेडे आणि कुटंबीयांवर निशाणा साधलायं. हलदर यांच्या वक्तव्यावर नवाब मलिक म्हणाले, हलदर तुम्ही ज्या संवैधानिक पदावर बसला आहात, त्यांची प्रतिष्ठा राखा. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्माने मुस्लिम आहेत, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे. एससी प्रमाणपत्रात खोटेपणा करून एका गरीब एससीचा हक्क हिरावून घेत समीर वानखेडे त्या पदावर बसले आहेत.

काही लोक म्हणाले की, ड्रग्जशी संबंधित या प्रकरणात पैसा आणि गुंडांचा समावेश आहे आणि मी माझा जीव गमावू शकतो. मला गप्प करण्याचा प्रयत्न झाला. पण मी म्हणालो होतो की आम्ही याला शेवटपर्यंत नेऊ. जर कोणी म्हणत असेल की आम्ही नवाब मलिकला मारू, तरीही मी त्याच दिवशी मरेन ज्या दिवशी मी मरायला हवं, असं मलिक म्हणाले.