मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं याची खंत – अजित पवार

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं हे कमीपणाचं वाटत असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.

मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसणं याची खंत – अजित पवार

मुंबई - आज अख्या जगात जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम केले जात आहेत. महिलांचा सन्मान केला जात आहे. याचदरम्यान महिला दिवसानिमित्त अधिवेशनात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी महिला कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पत्र, गुलाबाचे फूल आणि चॉकलेटचे वाटप केले. तसेच महिलांचं मनोबल वाढवण्याचे काम सध्या विधान भवनात होत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

मात्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र आपली खंत बोलून दाखवली. राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात न आल्याने त्यांनी सरकारला फटकारत राज्य सरकारचे वाभाडेच काढले. एवढा मोठा महाराष्ट्र पण जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला मंत्री नसणे हे कमीपणाचं असून महाराष्ट्राच्या सरकारला ते शोभत नसल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या मंत्रिमंडळात एकाही महिला लोकप्रतिनिधीला प्रतिनिधीत्व न देता, ज्या महाराष्ट्र राज्याने महिला धोरण राबवण्यासाठी सर्वप्रथम देशात पुढाकार घेतला होता, अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला हरताळ फासणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला महिला दिनाच्या शुभेच्छा ?, असा टोला राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.