तृणमूलची सत्ता आल्यास गोव्यात नवी पहाट - ममता बॅनर्जी

तृणमूलची सत्ता आल्यास गोव्यात नवी पहाट - ममता बॅनर्जी


ममता बॅनर्जींचा पत्रकार परिषदेत दावा

गोवा - समुद्राची किनार लाभलेला छोटासा गोवा हा एक सुंदर व समृद्ध असा प्रदेश आहे. या प्रदेशात नैसर्गिक साधनांची रेलचेल आहे. चांगल्या राजकर्त्यांची सत्ता आल्यास ह्या प्रदेशाचे सोने होऊ शकते. येत्यागोवा विधानसभा निवडणुकीत जर राज्यात तृणामूल कॉंग्रेस पक्षाची सत्ता आली तर खर्‍या अर्थाने राज्यात नवी पहाट उदयास येणार असल्याचा दावा तृणमूल कॉंग्रेसच्या सेर्वसर्वा तथा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जींनी ही सोनेरी पहाट राज्यात उदयास आणण्यास राज्यातील जनतेने पक्षाला पाठिंबा द्यावा, असे भावनीक आवाहन केले. भाजप धर्माच्या नावाने लोकांमध्ये द्वेषाची भावना पसरवू लागला असून हे असेच चालू राहिल्यास देशाला धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तृणमूल कॉंग्रेस येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत महिला व युवा नेत्यांना उमेदवारी देण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तृणमूल पक्ष सामान्यांतल्या सामान्य लोकांना उमेदवारी देणार असून त्यात टॅक्सीचालकापासून मच्छिमारांपर्यंत सर्वांचा समावेश असेल, असे त्यांनी पुढे सांगितले. युतीबाबत बोलताना त्यांनी आम्ही युतीसाठीची दारे बंद केलेली नाहीत. पण अशा युती यशस्वी होत नाहीत असा आपला अनुभव आहे. पक्षाचा मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा योग्य वेळी जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.

गोवा व प. बंगाल यांच्यात समुद्र, मासळी व फुटबॉल यांच्याबाबतीत साम्य असल्याचे त्यांनीसांगितले. प. बंगाल व गोव्याची संस्कृती ही समृद्ध असून राज्यात तृणमूल कॉंग्रेस पक्षाला सत्तेवर आणून ह्या दोन्ही संस्कृतींमधील नाते दृढ करण्यास गोव्यातील जनतेने सहकार्य करावे असे आवाहन बॅनर्जी यांनी केले. तृणमूल कॉंग्रेस व बंगालची संस्कृती ही दुसर्‍यांच्या तोंडाला काळे फासणार्‍यांची नव्हे. तसेच तृणमूलचे राजकारण हे तोडफोडीचे व गुंडगिरीचे राजकारण नाही. असे भाजपचे नाव न घेता त्या म्हणाल्या. भाजपने ज्या ज्या राज्यात प्रवेश केला आहे त्या त्या राज्यात गुंडगिरीचे व दादागिरीचे राजकारण सुरू केले असल्याचे त्या म्हणाल्या. प. बंगाल पाठोपाठ आत भाजपने त्रिपुरामध्ये गुंडगिरी सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या गोव्याचे शासन दिल्लीतून चालवले जात असून तृणमूल कॉंग्रेस गोव्यात सत्तेवर आल्यास राज्याचे प्रशासन गोव्यातूनच चालवले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.

तृणमूल कॉंग्रेसमुळे निवडणुकीत विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी होणार नाही का, असे विचारले असता अन्य पक्ष निवडणुकीत उतरतात तेव्हा मतांची विभागणी होत नाही का. तृणमूल पक्ष निवडणुकीत उतरला तरच मतांची विभागणी होते का असा प्रतिसवाल त्यांनी केला. राज्यात तुम्हाला सत्ता मिळेल असे वाटते काय, असे विचारले असता सत्ता मिळवण्यासाठीच आपण राज्यात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले. आज पहिल्यांदाच राज्यात आलेले असून आता पुन्हा पुन्हा येऊन जनतेच्या समस्या व प्रश्‍न जाणून घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. पर्यटन, खनिज उद्योग व मत्स्य उद्योग हे राज्याचे प्रमुख उद्योग असल्याचे सांगून त्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम आपला पक्ष सत्तेत आल्यास हाती घेण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो, पक्षाचे खासदार डेरिक ओब्राएन, स्थानिक नेते लवू मामलेदार व अन्य उपस्थित होते.

मच्छीमारांशी संवाद

काल ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधण्याबरोबरच राज्यातील मच्छिमारांशीही संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली. राज्यात तृणमूल कॉंग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास मच्छिमारांना सरकारकडून मिळणार्‍या अनुदानात अडीचपट वाढ करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी मच्छिमारांना दिले. मच्छिमारी व मत्स्य विक्री व्यवसायात असलेल्या सर्व महिला व पुरुषांना मासिक ४ हजार रु.चा भत्ता देण्यात येईल. तसेच मासेमारीसाठीच्या जाळीच्या खरेदी व दुरुस्तीसाठी पैसे देण्यात येतील. तसेच मच्छिमारी कल्याण मंडळाची स्थापना करणयाचे त्यांनी आश्‍वासन दिले.