पंतप्रधान आणि केंद्र सरकारला सद् बुद्धी दे : कौस्तुभ नवले

पंतप्रधान आणि केंद्र सरकारला सद् बुद्धी दे : कौस्तुभ नवले

युवक काँग्रेसने पांडुरंगाला घातले साकडे

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - हे पांडुरंगा देशात सर्वधर्मसमभावाचे आचरण करण्यासाठी तसेच या देशात सर्व धर्मियांना सुखासमाधानाने जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ दे. देशातील महागाई तसेच बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारला धोरण राबवण्याची सद्बुद्धी दे असे साकडे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी पांडुरंगाला घातले.

मंगळवारी (दि. १४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी आले होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने खराळवाडी, पिंपरी, पुणे येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सेवादलाचे शहराध्‍यक्ष वीरेंद्र गायकवाड, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष माऊली मलशेट्टी, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सौरभ शिंदे, युवक उपाध्यक्ष स्वप्निल बनसोडे, तसेच जेवियर अँथोनी, शंकर ढोरे, अर्णव कामथे, तेजस पाटील, स्वप्निल बनसोडे, सत्यम मण्डल, रोहन मडीकर, अमर पांडे, किरण नढे, संतोष नांगरे, दत्ता पवार, सचिन कदम आदी उपस्थित होते.

यावेळी सौरभ शिंदे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग सादर करीत हरिनामाचा गजर केला. कौस्तुभ नवले यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना कौस्तुभ नवले म्हणाले की, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन आणि अखिल वारकरी संप्रदायाची पवित्र भूमी असणाऱ्या देहू नगरीत शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांचे पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या वतीने स्वागतच आहे. यावेळी पांडुरंगाच्या चरणी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही साकडे घातले आहे की, आज देशाच्या सीमेवर चीन अतिक्रमण करीत आहे. याला पायबंद घालण्याची सद्बुद्धी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला द्यावी. हे पांडुरंगा देशात बेरोजगारी आणि गुन्हेगारी वाढत आहे. देशात सर्व धर्म समभावाचे आचरण करण्यासाठी, सर्वांना सुखासमाधानाने जगण्यासाठी वातावरण निर्माण होऊ दे. तसेच देशात मुबलक पाऊस होऊन बळीराजा सुखी सुखी होऊ दे. हे पांडुरंगा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी योग्य धोरणे आखण्याची सद्बुद्धी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला दे अशी विनवणी पांडुरंग चरणी करण्यात आली. तसेच महिला शहराध्यक्ष सायली नढे यांनी रोज होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे गॅसचे दर वाढत आहेत. त्यामुळे महिला भगिनींना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे अवघड होत आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे महिलांच्या वतीने महिला शहराध्यक्ष सायली नढे यांनी घातले.

https://youtu.be/fwHKWvtPpxs