आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कडून क्लीन चिट

आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कडून क्लीन चिट

मुंबई, दि. 27 मे - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला हाय-प्रोफाइल मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला गेल्या वर्षी मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आणि ड्रग्ज सापडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जामीन देण्यात आला.

पुराव्याअभावी’ सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एनसीबीने विशेष न्यायालयात आपले ‘अंतिम’ आरोपपत्र दाखल केले कारण आरोपपत्र दाखल करण्यासाठीची ६० दिवसांची मुदत 29 मे रोजी संपत आली होती. एनसीबीने दाखल केलेल्या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नाही. आरोपपत्रात म्हटले आहे की आर्यनकडे कोणतेही ड्रग्स आढळले नाहीत.

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ऑक्टोबरच्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणी आणि 26 दिवसांच्या कोठडीनंतर, मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 28 ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला. शेवटी 30 ऑक्टोबर रोजी तो तुरुंगातून बाहेर आला होता.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कर्डिलिया ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात आणले आहे. एनसीबी हे आरोपपत्र कोर्ट रजिस्ट्रीमध्ये सादर करणार आहे. या आरोपपत्राची रजिस्ट्रीद्वारे पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर ते आरोपपत्र न्यायालयात न्यायाधीशांसमोर सादर केले जाईल.

या प्रकरणात एकूण 20 आरोपी होते, त्यापैकी 18 आरोपी जामिनावर बाहेर असून 2 आरोपी अजूनही तुरुंगात आहेत. अब्दुल शेख आणि चिनेदू इग्वे अशी कारागृहात असलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. आरोपपत्राचे एकूण 10 खंड असून ते सध्या न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये आहे. 6000 पानांचे आरोपपत्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.