सिस्टम फेल झाल्याने ‘जन की बात’

सिस्टम फेल झाल्याने ‘जन की बात’

राहूल गांधी यांच्याकडून नरेंद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - देशात सध्या करोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढताना दिसत आहे. दररोज लाखांचा घरात नवीन रूग्ण आढळून येत आहेत. शिवाय, रूग्णांच्या मृत्यू संख्येही मोठी भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी देखील रूग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. एकीकडे देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून, केंद्र आणि राज्य सरकारं लढा देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तर, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं दिसून आलं आहे.

‘सिस्टम’ फेल आहे, म्हणून आता ‘जन की बात’ करणं महत्वाचं आहे. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. माझी सर्व काँग्रस सहकाऱ्यांना विनंती आहे की, सर्व राजकीय कामं सोडून केवळ लोकांना सर्व मदत करा, सर्व प्रकारे देशवासियांचं दुःख दूर करा. काँग्रेस परिवाराचा हाच धर्म आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.

या अगोदर “केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की ‘पीआर’ व अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्या ऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे. येणाऱ्या दिवसांमध्ये हे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवं. सध्याची दुर्दशा असहनीय आहे.” असं म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. तसेच, “करोनामुळे ऑक्सिजनचा स्तर घसरू होऊ शकतो, मात्र ऑक्सिजनचा तुटवडा आणि आयसीएयू बेडची कमतरतेमुळे अनेक मृत्यू होत आहे. भारत सरकार ही जबाबदारी तुमची आहे.” असं देखील राहुल गांधी केंद्र सरकारला उद्देशून म्हणालेले आहेत.

घरी विलगीकरणात आहे आणि सतत वाईट बातम्या येत आहेत. भारतात संकट केवळ करोनाचं नाही, केंद्र सरकारचे जनतेविरोधातील धोरण आहे. खोटे उत्सव व पोकळ भाषण नाही, देशाला तोडगा द्या. असं राहुल गांधी यांनी काही दिवसाअगोदर ट्विट केलेलं आहे.