समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर खाते

समीर वानखेडे यांच्या नावे बनावट ट्विटर खाते


मुंबई - अमली पदार्थविरोधी कारवाईमुळे प्रचंड चर्चेत असलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या नावे ट्विटरवर बनावट खाते उघडण्यात आले आहे. त्यावर एनसीबीकडून अमूक एका ठिकाणी छापा टाकण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यातील मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित वादावरही तेथे चर्चा केली जात आहे.
एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे अमली पदार्थविरोधी कारवाईने चर्चेत आले आहेत. त्यात आर्यन खान याच्या अटकेनंतर तर सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे. आर्यन खानविरुद्धच्या कारवाईनंतर नवाब मलिक हे सातत्याने वानखेडे यांच्यावर टीका करीत आहेत. ही कारवाई बनावट असल्याचा आरोप करीत मलिक यांनी वानखेडे यांना तुरुंगात पाठविण्याची धमकीदेखील दिली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ट्विटरवर वेगळीच चर्चावानखेडे यांच्या नावे बनावट खाते तयार करून सुरू झाली आहे.
@SamirWankhede_ या नावे हे खाते सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ते कार्यान्वित झाले. सुरुवातीला या खात्याच्या 'डीपी'मध्ये एनसीबीचा लोगो होता. 'आज आमच्या चमूने वांद्रे भागात तीन ठिकाणी छापे टाकले', असे ट्वीट त्यावर करण्यात आले. त्याला भरपूर प्रतिक्रिया मिळाल्या. त्यात 'हर्बल गांजा' मुद्द्यावरून मलिक यांच्यावर टीकादेखील करण्यात आली. तर काही प्रतिक्रियांमध्ये वानखेडे यांच्यावरही टीका करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत यावर चर्चा सुरू होती.