धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसात कोरोनाचे 423 बळी !

धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दहा दिवसात कोरोनाचे 423 बळी !

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक म्हणावे असे वाढले आहे.  गेल्या दहा दिवसात शहरात 423 रुग्ण कोरोनाने दगावले आहेत. पिंपळेगुरव, चिखली, रावेत, चिंचवड, वाकड, भोसरी, पिंपरी येथील सर्वाधिक मृत्यू होत आहेत. मृतांमध्ये कमी वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात केवळ सात जण दगावले होते. यंदा एप्रिलमध्ये मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अतिशय भयंकर आहे. या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. बेशिस्तीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी, खाट मिळणे अवघड होत आहे. आयसीयू, व्हेंटिलेटरच्या खाटा मिळत नाहीत. त्यामुळे आयसीयू उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी येतात. याच कारणामुळे कमी वयाचे रुग्ण देखील दगावत आहेत.

वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृतांचा आकडाही धडकी भरवणारा दिसून येत आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये कमी वयोगटातील रुग्णांचाही समावेश आहे. 25, 30, 35, 40 या वयोगटातील रुग्णांचाही मृत्यू होत आहे. ही बाब चिंताजनक आहे. मागील दहा दिवसात 423 जण दगावले आहेत. 9 एप्रिल रोजी 23 जण दगावले, 10 एप्रिल 28, 11 एप्रिल 30, 12 एप्रिल 34, 13 एप्रिल 41, 14 एप्रिल 45, 15 एप्रिल सर्वाधिक 61 रुग्ण दगावले, 16 एप्रिल 54, 17 एप्रिल 54 आणि 18 एप्रिल रोजी 53 असे 423 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.वेळेत उपचार आणि आयसीयू बेड मिळाले, तर हे प्रमाण कमी होऊ शकेल.