मोदींमुळेच हे शक्य - सायरस पूनावाला

नवी दिल्ली -कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने १०० कोटींचा मोठा टप्पा पार केल्याच्या पार्श्वभूमीवर देशातल्या लस उत्पादकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चर्चा केली. यावरून भारताने १ अब्ज लसीकरणाचा टप्पा गाठला तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळेच, असे म्हणत सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे.
पूनावाला म्हणाले की, प्रवाहाविरुद्ध जाऊन पंतप्रधानांनी सगळ्यांना वेगाने हालचाली करायला लावल्या. ते नसते आणि फक्त आरोग्य मंत्रालयाकडे नियंत्रण असतं तर आज भारत एक अब्ज डोस तयार करू शकला नसता. माझ्या मनात याबद्दल कोणतीही शंका नाही. नोव्हेंबरमध्ये जेव्हा ते पुण्यात आले तेव्हा मी त्यांना आश्वासन दिले होते आणि आज भारताला कोविड लसींबद्दल स्वयंपूर्ण बनवण्याचे आमचे आश्वासन पूर्ण झाल्याबद्दल त्यांना आनंद झाला. जगातील सर्वात कमी संभाव्य किमतीत भारतात लस उपलब्ध आहे. पंतप्रधान नियामक परवानग्या मिळविण्यासाठी प्रवाहाविरुद्ध गेले आणि आज भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकृत करू शकला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी देश आणि लस उत्पादकांना महत्त्वपूर्ण संख्या गाठण्यास मदत केल्याबद्दल भारत सरकारचे आभार मानले. सरकारसोबत आम्ही काम केले आहे आणि याच कारणामुळे आम्ही हे लक्ष्य साध्य करु शकलो. आम्ही भविष्यातील योजना आणि संबंधित धोरणे कशी वाढवू शकतो यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. भारताने लस निर्यात आणि उत्पादनात पुढे राहणे आवश्यक आहे, असे अदर पूनावाला म्हणाले.