भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या मेळाव्याला हजर; संजय राउत यांचा गौप्यस्फोट

भाजपचे नगरसेवक शिवसेनेच्या मेळाव्याला हजर; संजय राउत यांचा गौप्यस्फोट


नाशिक - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली असून माजी उपमहापौर प्रथमेश गितेंपाठोपाठ आता नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी शनिवारी (दि. २३) शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे. भाजपचे जवळपास १७ ते १८ लोक आपल्याला प्रवेशासाठी भेटून गेल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये आगामी काळात मोठी पडझड पाहायला मिळणार आहे.
नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने वर्चस्व मिळवण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे. खासदार संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राऊत यांनी स्वत: नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत लक्ष घातले असून भाजपला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपमध्ये असलेले माजी आमदार वसंत गिते, सुनील बागूल यांनी चार महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांनी देखील प्रवेश केला. शनिवारी राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात नाशिक प्रभाग समितीच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपच्या विशाल संगमनेरे यांनी शिवसेनेच्या मंचावर येऊन थेट संजय राऊत यांचा सत्कार केला. त्यामुळे गिते पाठोपाठ संगमनेरे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.