बारणे यांना मावळमधून विक्रमी मताधिक्य देण्याची आजी-माजी आमदारांची ग्वाही   मावळ तालुक्यात नेते व कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक गाठीभेटी

 

मावळ तालुक्यात नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांशीही साधना श्रीरंग बारणे यांनी संवाद

 

तळेगाव दाभाडे, (प्रबोधन न्यूज ) - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, भाजपचे मावळ तालुका प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन नेते तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मावळच्या आजी-माजी आमदारांनी श्रीरंग बारणे यांना तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.

 शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारणे यांनी आज (रविवारी) प्रथमच मावळ तालुक्यात प्रमुख नेते व कार्यकर्त्यांची वैयक्तिक भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली. सर्व ठिकाणी बारणे यांचे उस्फूर्त स्वागत व सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकदिलाने व मेहनतीने काम करून बारणे यांना ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.

 आमदार सुनील शेळके यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली. त्यावेळी आमदारांचे वडील  शंकरराव शेळके व परिवारातील सदस्य उपस्थित होते. शेळके परिवाराच्या वतीने खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर बारणे यांनी आमदार शेळके यांच्याशी तालुक्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. तालुक्यात राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांची मोठी ताकद असल्याने बारणे यांना तालुक्यात विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास शेळके यांनी यावेळी व्यक्त केला.

 भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी देखील खासदार बारणे यांचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. त्यावेळी बाळा भेगडे यांचे बंधू विकास भेगडे व परिवारातील सदस्य, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, शंकरराव शिंदे, शिवसेनेचे राजेंद्र तरस, सुनील तथा मुन्ना मोरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच 400 हून अधिक खासदार निवडून आणण्याचा भाजपचा संकल्प पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, अशी ग्वाही बाळा भेगडे यांनी दिली.

 भाजपचे मावळ विधानसभा मतदारसंघ प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांच्या निवासस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, संघटन मंत्री रवींद्र देशपांडे, बैलगाडा मालक संघटनेचे अण्णासाहेब भेगडे, मनोहर भेगडे, रघुवीर शेलार, संतोष दाभाडे, राजेंद्र जांभुळकर, चंद्रशेखर भोसले चऱ्होलीकर, राजेंद्र तरस, सुनील मोरे, संजय वाडेकर, वैभव कोतुळकर, अनंत चंद्रचूड, संदीप सोमवंशी, शुभम सातकर आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 यापूर्वी दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे व मेहनतीमुळे आपण चांगल्या मतांनी विजयी झालो, असे नमूद करून या निवडणुकीतही सर्वांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे लोकसभेत काही काळ विरोधात बसावे लागले, मात्र त्या काळातही आपण कधीच भाजपच्या विरोधात बोललो नाही. कधीही चुकीचे काम केले नाही आणि करणारही नाही, असे बारणे यांनी स्पष्ट केले.

 यावेळी बोलताना उपस्थित नेते व कार्यकर्ते यांनी श्रीरंग बारणे यांना मावळ तालुक्यातून 'रेकॉर्ड ब्रेक' मते मिळवून देण्याचा निर्धार केला. खासदार बारणे यांच्या हॅटट्रिक बरोबरच मावळ तालुक्याला प्रथमच केंद्रात मंत्रिपदाची संधीही मिळेल, असा विश्वास रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केला.